नवी दिल्ली : संघ लोक सेवा आयोगाने (UPSC , Union Public Service Commission) सिव्हिल सेवा परीक्षेसंदर्भात (CSE, Civil Services Examination) मोठा आणि महत्त्वाचा नियम बदल जाहीर केला आहे. UPSC कडून जारी करण्यात आलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार (Guidelines), एकदा निवड झालेले उमेदवार पुन्हा पुन्हा सिव्हिल सेवा परीक्षा देऊ शकणार नाहीत. विशेषतः आधीच Indian Administrative Service (IAS) किंवा Indian Foreign Service (IFS) मध्ये नियुक्त किंवा निवड झालेले उमेदवार CSE 2026 साठी अपात्र ठरणार आहेत.
UPSC ने 4 फेब्रुवारी रोजी जाहीर केलेल्या अधिकृत सर्क्युलरमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, “मागील सिव्हिल सेवा परीक्षेच्या निकालाच्या आधारे जो उमेदवार IAS किंवा IFS मध्ये नियुक्त झाला असून त्या सेवेत कार्यरत आहे, तो सिव्हिल सेवा परीक्षा 2026 साठी पात्र असणार नाही.” तसेच, जर एखादा उमेदवार CSE 2026 ची प्राथमिक परीक्षा (Prelims) दिल्यानंतर IAS किंवा IFS मध्ये नियुक्त झाला, तर तो सिव्हिल सेवा मुख्य परीक्षा (Mains) 2026 मध्ये सहभागी होऊ शकणार नाही, जोपर्यंत तो त्या सेवेचा राजीनामा देत नाही.
या नियमाचा अर्थ असा की, उमेदवाराने जर IAS किंवा IFS ची सदस्यता कायम ठेवली, तर तो CSE 2026 ची प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण झाली असली तरीही मुख्य परीक्षेसाठी अपात्र ठरेल. UPSC च्या या निर्णयामुळे “better service” मिळवण्यासाठी पुन्हा पुन्हा परीक्षा देण्याची पद्धत थांबवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मानले जात आहे.
हेही वाचा: Raj Thackeray On Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर वाहतूकसेवा कोलमडली! राज ठाकरेंनी दखल घेत सरकारवर केला प्रश्नांचा भडीमार
मात्र, Indian Police Service (IPS) आणि Central Services Group ‘A’ साठी नियम तुलनेने कमी कडक ठेवण्यात आले आहेत. जर एखादा उमेदवार CSE 2026 च्या निकालाच्या आधारे IPS किंवा Group ‘A’ सेवेत निवडला गेला, तर काही अटी पूर्ण केल्यास त्याला CSE 2027 मध्ये पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळू शकते.
दरम्यान, UPSC ने प्रयत्नांच्या (Attempts) संख्येबाबतचे नियमही पुन्हा स्पष्ट केले आहेत. सामान्य प्रवर्गातील (General Category) उमेदवारांना सिव्हिल सेवा परीक्षेसाठी एकूण सहा प्रयत्न करता येतात. अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील उमेदवारांना अमर्यादित प्रयत्नांची मुभा आहे. तर इतर मागास वर्ग (OBC) आणि बेंचमार्क अपंगत्व असलेल्या व्यक्तींना (PwBD, Persons with Benchmark Disabilities) एकूण नऊ प्रयत्न करण्याची परवानगी आहे. UPSC ने स्पष्ट केले आहे की, प्राथमिक परीक्षा दिली की तो एक प्रयत्न (Attempt) म्हणून गणला जाईल.
UPSC च्या या नव्या नियमांमुळे सिव्हिल सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली असून, यामुळे परीक्षेची स्पर्धा आणि सेवांमधील स्थैर्य वाढेल, असा आयोगाचा विश्वास आहे.
हेही वाचा: Pune Bangalore Highway: महामार्गांवर कोंडीचे 'ग्रहण'; पुणे - मुंबईनंतर आता पुणे-बेंगळुरू हायवे ठप्प; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा