Wednesday, February 18, 2026 06:43:39 PM

Republic Day 2026: गीत नव्हे, राष्ट्राचा आत्मा! प्रजासत्ताक दिनी ‘वंदे मातरम्’च्या 150 वर्षांचा गौरव; कर्तव्यपथावर अभिमानाचा महासोहळा

प्रजासत्ताक दिन 2026 च्या सोहळ्यात ‘वंदे मातरम्’च्या 150 वर्षांच्या गौरवशाली प्रवासावर विशेष भर देण्यात आला.

republic day 2026 गीत नव्हे राष्ट्राचा आत्मा प्रजासत्ताक दिनी ‘वंदे मातरम्’च्या 150 वर्षांचा गौरव कर्तव्यपथावर अभिमानाचा महासोहळा

Republic Day 2026: 2026 च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर होणाऱ्या सोहळ्यात यंदा ‘वंदे मातरम्’च्या 150 वर्षांच्या गौरवशाली प्रवासावर केंद्रित होता. स्वदेशी, आत्मनिर्भरता आणि स्वातंत्र्याची जाणीव भारतीय जनमानसात जागवणारे हे राष्ट्रीय गीत यंदाच्या समारंभाचे मुख्य सूत्र ठरले. राष्ट्रपती भवनापासून राष्ट्रीय युद्ध स्मारकापर्यंत पसरलेला कर्तव्यपथ या ऐतिहासिक प्रसंगासाठी आकर्षक आणि भव्य स्वरूपात सजवण्यात आला असून, देशाच्या सांस्कृतिक वारशाचा आणि राष्ट्रभक्तीचा अभिमानास्पद दर्शन घडवणारा हा सोहळा होता..

“वंदे मातरम्” हे केवळ एक गीत नाही, तर भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा आत्मा आहे. मातृभूमीप्रती नतमस्तक होण्याची भावना व्यक्त करणारे हे गीत पुढील पिढ्यांना देशप्रेम, त्याग आणि एकतेचा संदेश देत आले आहे. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी ‘वंदे मातरम्’ या भारताच्या राष्ट्रीय गीताला १५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने या ऐतिहासिक गीताचा प्रवास, त्याचे महत्त्व आणि राष्ट्रजीवनातील स्थान समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

साहित्यापासून राष्ट्रचळवळीपर्यंतचा प्रवास

‘वंदे मातरम्’ची रचना बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी केली. हे गीत सर्वप्रथम १८७५ साली प्रसिद्ध झाले. त्यानंतर १८८२ मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या अजरामर कादंबरी ‘आनंदमठ’मध्ये या गीताचा समावेश करण्यात आला. पुढे रवींद्रनाथ टागोर यांनी या गीताला संगीतबद्ध केले. साहित्याच्या पानांवर जन्मलेले हे गीत हळूहळू जनतेच्या ओठांवर येऊ लागले आणि स्वातंत्र्यलढ्याचे प्रभावी शस्त्र बनले.

‘आनंदमठ’ आणि देशभक्तीचा विचार

‘आनंदमठ’ या कादंबरीत संन्यासी क्रांतिकारकांची कथा मांडण्यात आली आहे. हे संन्यासी मातृभूमीला देवीस्वरूप मानून तिच्यासाठी सर्वस्व अर्पण करतात. त्यांच्या उपासनेत भूतकाळातील वैभवशाली भारत, वर्तमानातील दुर्दशा आणि भविष्यातील तेजस्वी भारताचे प्रतीक दिसते. ‘वंदे मातरम्’ हे गीत या देशभक्तीच्या विचारांचे प्रतीक ठरले.

स्वातंत्र्यलढ्यातील रणघोष

१९०५ मधील बंगाल विभाजनाच्या विरोधात सुरू झालेल्या स्वदेशी चळवळीने ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली. रस्त्यांवर, सभांमध्ये, मोर्चांमध्ये आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनांमध्ये हे घोषवाक्य घुमू लागले. १८९६ मध्ये कोलकात्यातील काँग्रेस अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी ‘वंदे मातरम्’चे गायन केले होते. त्यानंतर हे गीत संपूर्ण देशात राष्ट्रजागृतीचे प्रतीक बनले.

ब्रिटिश सत्तेला हादरा

‘वंदे मातरम्’च्या वाढत्या प्रभावामुळे ब्रिटिश सरकार अस्वस्थ झाले. अनेक ठिकाणी हे गीत गाण्यावर बंदी घालण्यात आली. शाळा-महाविद्यालयांत विद्यार्थ्यांवर दंड, शिक्षा आणि कारवाई करण्यात आली. तरीही जनतेने मागे न हटता हे गीत अधिक जोमाने स्वीकारले. महाराष्ट्र, बंगाल, पंजाब, तामिळनाडू अशा विविध राज्यांमध्ये ‘वंदे मातरम्’ हा लढ्याचा आवाज बनला.

देशाबाहेरही ‘वंदे मातरम्’

भारतीय स्वातंत्र्यचळवळीचा आवाज देशाच्या सीमा ओलांडून परदेशातही पोहोचला. १९०७ मध्ये मॅडम भीकाजी कामा यांनी जर्मनीत पहिल्यांदा भारतीय ध्वज फडकवला, ज्यावर ‘वंदे मातरम्’ लिहिले होते. परदेशातील भारतीय क्रांतिकारकांसाठी हे गीत प्रेरणास्थान ठरले.

राष्ट्रीय गीताचा दर्जा

स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय प्रतीकांबाबत चर्चा सुरू असताना ‘वंदे मातरम्’ आणि ‘जन गण मन’ या दोन्ही गीतांबाबत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. २४ जानेवारी १९५० रोजी संविधान सभेत ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत तर ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत म्हणून मान्यता देण्यात आली. राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीताइतकाच मान देण्यात येईल, असे स्पष्ट केले.

आजच्या पिढीसाठी अर्थ

आज ‘वंदे मातरम्’ केवळ इतिहासातील गीत नाही, तर राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक आहे. विविध कार्यक्रम, शाळा, सांस्कृतिक उपक्रम आणि राष्ट्रीय सणांमध्ये हे गीत आजही तितक्याच अभिमानाने गायले जाते. देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा हे गीत अजूनही देत आहे.

150 वर्षांचे स्मरणोत्सव

‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षांच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. परिसंवाद, प्रदर्शने, विशेष गायन कार्यक्रम आणि शैक्षणिक उपक्रमांद्वारे या गीताचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारत सरकारकडूनही या ऐतिहासिक टप्प्याचे चार टप्प्यांत स्मरणोत्सव साजरे केले जाणार आहेत.

‘वंदे मातरम्’ हे गीत भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा आत्मा आहे. मातृभूमीप्रती नतमस्तक होण्याची भावना, त्याग, एकता आणि राष्ट्रभक्ती यांचे दर्शन घडवणारे हे गीत गेल्या १५० वर्षांपासून भारतीयांच्या मनात अढळ स्थान राखून आहे. काळ बदलला, पिढ्या बदलल्या, पण ‘वंदे मातरम्’चा संदेश आजही तितकाच जिवंत आहे.


सम्बन्धित सामग्री