मुंबई: क्रिकेट चाहत्यांसाठी ही खरंच दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे. बराच काळ प्रतीक्षेत असलेली एक मोठी घडामोड अखेर घडली असून, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताच्या एका दिग्गज खेळाडूने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. सातत्य, संयम आणि दमदार कामगिरीच्या जोरावर मिळालेल्या या यशामुळे क्रिकेटविश्वात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. नेमकं काय घडलं आहे, कोणत्या विक्रमामुळे सगळीकडे चर्चा सुरू आहे हे आता आपण जाणून घेवूयात.
वनडे क्रिकेटमधील जबरदस्त फॉर्मच्या जोरावर विराट कोहली याने जुलै 2021 नंतर प्रथमच आयसीसी फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. वडोदरा येथे न्यूझीलंडविरुद्ध सुरू झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात कोहलीने 91 चेंडूत 93 धावांची जबरदस्त खेळी करत भारताच्या विजयाचा पाया रचला आणि सहकारी रोहित शर्मा याला मागे टाकत पुन्हा एकदा सिंहासनावर विराजमान झाला. ही त्याच्या कारकिर्दीतील 11 वी वेळ आहे की तो आयसीसी पुरुष वनडे फलंदाजी क्रमवारीत नंबर वन ठरला आहे.
ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग दोन वेळा शून्यावर बाद झाल्यानंतर कोहलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र त्यानंतर सिडनीमध्ये 74 धावांची संयमी खेळी करत त्याने पुनरागमनाचे संकेत दिले. त्यानंतर भारतात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याने 135, 102 आणि नाबाद 65 अशा दमदार धावा करत पुन्हा आपली सर्वोच्च गुणवत्ता सिद्ध केली. ऑक्टोबर 2013 मध्ये प्रथमच अव्वल स्थानी पोहोचलेल्या कोहलीने आतापर्यंत एकूण 825 दिवस नंबर एक स्थानावर घालवले असून, हा भारतीय फलंदाजांमधील सर्वोच्च आकडा आहे. दिवस निकषांच्या आधारित यादीत तो सध्या दहाव्या क्रमांकावर असून, वेस्ट इंडिजचा दिग्गज विव्ह रिचर्ड्स 2306 दिवसांसह पहिल्या स्थानावर आहे.
हेही वाचा: PAU Machine Controversy : 'ठाकरे बंधूंना पराभवाची चाहूल लागलीये...', 'पाडू' मशीनवरील राज ठाकरेंच्या आरोपांना बावनकुळेंचे चोख प्रत्युत्तर
मात्र कोहलीसाठी हे अव्वल स्थान टिकवणे सोपे नसणार आहे. न्यूझीलंडचा फलंदाज डॅरिल मिचेल केवळ एका रेटिंग पॉइंटने त्याच्या मागे आहे. भारताविरुद्ध पहिल्या सामन्यात मिचेलने 84 धावांची आक्रमक खेळी करत रोहित शर्माला मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे, तर रोहित सध्या तिसऱ्या स्थानावर असून कोहलीपेक्षा 10 पॉइंट्स मागे आहे.
इतर बदलांमध्ये केएल राहुल एक स्थान वर येत 11 व्या क्रमांकावर पोहोचला आहे, तर न्यूझीलंडचा डेव्हॉन कॉनवे तीन स्थानांची झेप घेत 29 व्या क्रमांकावर आला आहे. गोलंदाजांमध्ये मोहम्मद सिराज पाच स्थानांची प्रगती करत 15 व्या क्रमांकावर पोहोचला, तर काइल जेमिसन ने थेट 27 स्थानांची झेप घेत 69 वे स्थान मिळवले आहे.
दरम्यान, आयसीसी पुरुष कसोटी क्रमवारीत अॅशेस मालिकेतील अंतिम सामन्यात शतके झळकावल्यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर पोहोचले आहेत. इंग्लंडचा जो रूट मालिकेत सर्वाधिक धावा करत अव्वल स्थानावर कायम आहे, तर हॅरी ब्रूक दुसऱ्या क्रमांकावर आहे. गोलंदाजांमध्ये मालिकावीर ठरलेला मिचेल स्टार्क 31 विकेट्ससह नवव्या स्थानावरून थेट तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे.
हेही वाचा: BMC Election 2026 : 'ठाकरे बेस्ट' पोस्ट विरुद्ध 'महादेव' कार्ड; निवडणुकीच्या अवघ्या काही तास आधी रंगली सोशल मेडियावर चर्चा