Wednesday, January 14, 2026 01:15:32 PM

Russia-India Relations: 'आम्ही भारताला कोणत्याही व्यत्ययाशिवाय तेल पुरवठा करत राहू'; पुतिन यांचे भारताला आश्वासन

संयुक्त पत्रकार परिषदेत पुतिन म्हणाले की, रशिया भारताच्या वाढत्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यास पूर्णतः वचनबद्ध आहे.

russia-india relations आम्ही भारताला कोणत्याही व्यत्ययाशिवाय तेल पुरवठा करत राहू पुतिन यांचे भारताला आश्वासन

Russia-India Relations: नवी दिल्लीमध्ये झालेल्या 23 व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेनंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारताला उर्जेचा स्थिर आणि अखंडित पुरवठा सुरू ठेवण्याचे स्पष्ट आश्वासन दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत पुतिन म्हणाले की, रशिया भारताच्या वाढत्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यास पूर्णतः वचनबद्ध आहे. पुतिन म्हणाले, 'तेल, वायू आणि कोळसा पुरवण्यात रशिया हा भारताचा विश्वासार्ह भागीदार राहिला आहे. भारतीय अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत आहे आणि आम्ही तिच्या ऊर्जा गरजा कोणत्याही व्यत्ययाशिवाय पूर्ण करत राहू.' 

अमेरिकी निर्बंधांमध्येही भागीदारी मजबूत करण्याची तयारी

अमेरिकेकडून लादलेल्या विविध निर्बंधांच्या पार्श्‍वभूमीवरही भारत आणि रशियाने आर्थिक व व्यापार सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी पाच वर्षांचा धोरणात्मक आराखडा तयार करण्यावर सहमती दर्शविली. मोदी-पुतिन चर्चेत युक्रेन युद्धावरही विशेष चर्चा झाली. पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले की, युक्रेनमधील संघर्ष संवादाद्वारे संपवला गेला पाहिजे. भारत नेहमी शांततेचा पुरस्कार करत आला आहे. शिखर परिषदेनंतर दोन्ही नेत्यांनी गेल्या आठ दशकांपासून टिकून असलेल्या ऐतिहासिक भारत-रशिया मैत्रीला नव्या वेगाने पुढे नेण्याचा मानस व्यक्त केला.

हेही वाचा - India-Russia Vision 2030: आर्थिक सहकार्याला मोठी चालना! भारत-रशिया ‘व्हिजन 2030’ आर्थिक सहकार्य करारावर स्वाक्षरी

दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वाचे करार

दोन्ही देशांनी 2030 पर्यंतच्या आर्थिक सहकार्याच्या कार्यक्रमाला अंतिम स्वरूप देत आरोग्य, गतिशीलता, दुर्मिळ पृथ्वी खनिज, यांसह अनेक क्षेत्रांमध्ये करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. पंतप्रधान मोदी म्हणाले, जगात अनेक संकटे आली, अनेक बदल झाले. पण भारत-रशिया मैत्री ध्रुवताऱ्याप्रमाणे स्थिर राहिली आहे. ते म्हणाले की, दोन्ही देश युरेशियन आर्थिक संघासोबतचा मुक्त व्यापार करार (FTA) लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

हेही वाचा - Putin in India: भारत दौऱ्यावर पुतीन यांचे विशेष विमान; त्यावरील 'Poccия' या शब्दाचा अर्थ काय?

दहशतवादाविरुद्ध संयुक्त लढा

दरम्यान, दहशतवादावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, 'पहलगाम दहशतवादी हल्ला असो किंवा क्रोकस सिटी हॉलवरील हल्ला. या घटनांचे मूळ एकच आहे. दहशतवाद हा मानवतेवर थेट हल्ला आहे आणि त्याविरोधात जागतिक एकता हीच आपली ताकद आहे.' तथापी, पुतिन यांनी सांगितले की दोन्ही देशांनी सुरक्षा, व्यापार, अर्थव्यवस्था आणि सांस्कृतिक आदान-प्रदान यांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. रशिया आणि भारत द्विपक्षीय व्यापार 100 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याच्या शक्यतांचा अभ्यास करत असल्याचे पुतिन यांनी स्पष्ट केले. भारत-रशिया संबंधांना नव्या उंचीवर नेण्याचा संदेश या शिखर परिषदेतून दोन्ही राष्ट्रप्रमुखांनी दिला आहे.
 


सम्बन्धित सामग्री