Wednesday, November 19, 2025 12:28:32 PM

Operation Sindoor : '..तर पाकिस्तानला याहूनही भयंकर प्रत्युत्तर मिळेल', भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा इशारा

लेफ्टनंट जनरल कटियार यांनी नुकतीच जम्मूमध्ये पत्रकारांशी आणि माजी लष्करी जवानांना संबोधित करताना पाकिस्तानच्या भूमिकेवर भाष्य केले.

operation sindoor  तर पाकिस्तानला याहूनही भयंकर प्रत्युत्तर मिळेल भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा इशारा

Western Army Commander Manoj Kumar Katiyar on Pakistan : पाकिस्तानची भारताशी किंवा कोणाशीही थेट लढण्याची क्षमता नसल्याने पाकिस्तानकडून पहलगामसारख्या हल्ल्याचा प्रयत्न शक्य आहे. यामुळे भारतीय सेना दले नेहमीच तयारीत राहतात आणि 'ऑपरेशन सिंदूर'च्या धर्तीवर व्यापक कारवाईची तयारी करून ठेवली असल्याचे भारताचे वेस्टर्न आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल मनोज कुमार कटियार यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानने कसलाही नसता उपद्व्याप केल्यास पाकिस्तानला यापूर्वी दिले आहे, त्याहूनही अधिक भयंकर प्रत्युत्तर देण्यात येईल, असा थेट इशारा दिला कटियार यांनी आहे. पाकिस्तानमध्ये भारताशी थेट लढण्याची क्षमता नसल्यामुळे तो पुन्हा एकदा पहलगामसारखा (Pahalgam) हल्ला करण्याचा प्रयत्न करू शकतो, असे लेफ्टनंट जनरल कटियार म्हणाले. मात्र, तसे झाल्यास भारत पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) सारखी मोहीम राबवेल आणि यावेळी भारताचे प्रत्युत्तर अधिक भयंकर व व्यापक असेल, असा त्यांनी ठाम विश्वास व्यक्त केला.

भारताचे प्रत्युत्तर असेल अधिक भयंकर
लेफ्टनंट जनरल कटियार यांनी नुकतीच जम्मूमध्ये पत्रकारांशी आणि माजी लष्करी जवानांना संबोधित करताना पाकिस्तानच्या भूमिकेवर भाष्य केले.
ऑपरेशन सिंदूरची आठवण: ते म्हणाले, "ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने पाकिस्तानवर मोठा हल्ला केला होता. त्या हल्ल्यात आम्ही त्यांच्या चौक्या, हवाई तळ आणि दहशतवाद्यांचे तळ नष्ट केले. आपण चोख प्रत्युत्तर दिले असले तरी, ते पुन्हा काहीतरी करण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे आपल्याला सतर्क राहावे लागेल."
नेहमी सज्जता आणि पाकड्यांना धडा शिकवण्याचा निर्धार: वेस्टर्न आर्मी कमांडर यांनी स्पष्ट केले, "पाकिस्तानने कुठलाही प्रयत्न केला तर भारताचे प्रत्युत्तर खूप भयंकर असेल. आपले प्रत्युत्तर हे भयंकरच असले पाहिजे, याबाबत कुठलीही शंका असू नये. आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत. मला विश्वास आहे की, पाकिस्तानविरोधात भारताने यापूर्वी केलेल्या कारवायांपेक्षा यावेळी भारत अधिक मोठी व व्यापक कारवाई करेल."

हेही वाचा - Jaisalmer Bus Fire: जैसलमेरमध्ये दुर्दैवी अपघात! चालत्या बसला लागलेल्या आगीत 15 जणांचा मृत्यू, 40 हून अधिक जखमी

पाकिस्तान सुधारणार नाही, पाकिस्तानचे शेपूट सदैव वाकडे
लेफ्टनंट जनरल कटियार यांनी पाकिस्तानच्या दुष्ट कारवायांच्या स्वभावावरही भाष्य केले. पाकिस्तानचे शेपूट सदैव वाकडेच राहते याचा वारंवार अनुभव घेतलेला असल्याने भारताने भविष्यातील कृतींची निश्चितपणे विचार करून ठेवला आहे. "पाकिस्तान कधीच सुधारणार नाही. तो त्याच्या दुष्ट कारवाया करत राहणार. कारण त्यांच्याकडे भारताशी थेट लढण्याची क्षमता व धाडस नाही. असं असलं तरी भारतीय लष्कर त्यांचे सगळे मनसुबे निष्फळ करण्यास सज्ज आहे, कारण आपल्याला आपल्या जनतेचा पाठिंबा आहे. ऑपरेशन सिंदूरदरम्यान आपण पाकिस्तानला चारीमुंड्या चित केलं होतं. त्यावेळी देखील भारतीय सैन्याला लोकांचा आणि प्रामुख्याने माजी सैनिकांचा पाठिंबा होता."

ऑपरेशन सिंदूर
22 एप्रिल रोजी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला होता, त्या हल्ल्यात 26 पर्यटक ठार झाले होते. या भयंकर हल्ल्यानंतर भारताच्या सशस्त्र दलांनी 7 मे रोजी 'ऑपरेशन सिंदूर' ही मोहीम हाती घेतली. या कारवाईत भारतीय वायूदलाने (Indian Air Force) पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ नष्ट केले होते.

हेही वाचा - SC Allows Green Firecrackers : दिल्लीत पर्यावरणपूरक फटाके वाजवण्यास परवानगी; सर्वोच्च न्यायालयाने वेळेची मर्यादा केली निश्चित


सम्बन्धित सामग्री