What is Mayday Call: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान दुर्घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. एअर इंडिया फ्लाइट AI-171 ही लंडनसाठी निघाली होती. टेकऑफनंतर काही सेकंदातच विमानात स्फोट झाला आणि ते क्रॅश झालं. या विमानात 242 प्रवासी होते, ज्यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचाही समावेश होता. टेकऑफनंतर पायलटने 'मेडे कॉल' (Mayday Call) दिला होता. पण अखेर विमानाशी संपर्क तुटला आणि मोठी दुर्घटना घडली.
मेडे कॉल म्हणजे नेमकं काय?
मेडे कॉल ही एक आंतरराष्ट्रीय आपत्कालीन सिग्नल प्रणाली आहे. जेव्हा एखादं विमान किंवा जहाज अत्यंत गंभीर संकटात सापडतं जसं की इंजिन फेल होणं, आग लागणं, क्रॅश होण्याचा धोका असणं तेव्हा पायलट रेडिओवरून 'Mayday, Mayday, Mayday' असं पुन्हापुन्हा उच्चारतो. याचा अर्थ असतो, 'माझं आयुष्य धोक्यात आहे, कृपया मदत करा.'
ही कॉल एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) ला दिली जाते, जेणेकरून तातडीनं मदत पाठवता येईल. हा कॉल दिल्यानंतर संबंधित विमान, जहाज किंवा यंत्रणेला इतर सगळ्या गाड्यांना, विमानांना रस्ता मोकळा करून तातडीनं प्राथमिकता दिली जाते.
हेही वाचा: Ahmedabad Plane Crash: ज्योतिषीची भविष्यवाणी खरी ठरली? अहमदाबाद विमान अपघातानंतर चर्चेला उधाण
‘Mayday’ या शब्दाची सुरुवात कशी झाली?
1923 साली लंडनच्या क्रॉयडन विमानतळावरील रेडिओ ऑफिसर फ्रेडरिक मॉकफोर्ड यांनी या शब्दाचा वापर सुरू केला. त्यांनी हा शब्द फ्रेंच भाषेतील 'm’aider' या शब्दावरून घेतला, ज्याचा अर्थ आहे. 'मदत करा मला.' 1948 मध्ये हा शब्द आंतरराष्ट्रीय नियमांमध्ये अधिकृतपणे समाविष्ट करण्यात आला.
मेडे कॉल फक्त विमानांसाठी नाही
ही सिस्टीम केवळ हवाई वाहतुकीसाठी मर्यादित नाही. जलवाहतुकीत, पोलिस विभाग, फायर ब्रिगेड आणि काही देशांमध्ये रस्ता वाहतूक एजन्सी देखील मेडे कॉलचा वापर करतात. जर संबंधित यंत्रणेचं रेडिओ सिग्नल बंद पडलं असेल, तर जवळचं दुसरं जहाज किंवा विमान त्यांच्यावतीने ‘मेडे रिले कॉल’ देऊ शकतं.
हेही वाचा: Ahmedabad Plane Crash: एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेत चमत्कारिक बचाव; प्रवासी विश्वशकुमार रमेश यांनी सांगितला जीवघेणा अनुभव
खोटा मेडे कॉल केल्यास शिक्षा
अमेरिका आणि इतर काही देशांमध्ये जर एखादी व्यक्ती मुद्दाम खोटी मेडे कॉल करते, तर तिच्यावर कडक कारवाई होते. 6 वर्षांची तुरुंगवास आणि तब्बल 2.5 लाख डॉलर (जवळपास २ कोटी रुपये) इतका दंडही होऊ शकतो.
अहमदाबादच्या दुर्घटनेत पायलटने मेडे कॉल का दिला?
AI-171 फ्लाइट टेकऑफ करत असताना विमानात तांत्रिक बिघाड झाला आणि बॉम्बसदृश स्फोटही झाल्याचं प्रत्यक्षदर्शी सांगतात. पायलटने परिस्थितीच्या गांभीर्याची जाणीव होताच ATC ला मेडे कॉल दिला. यानंतर काही सेकंदातच संपर्क तुटला आणि विमान कार्गो ऑफिसजवळ कोसळलं.
मेडे कॉल ही विमानसेवेतील गंभीर आणि अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. ती वेळेवर दिली गेल्यास अनेक जीव वाचू शकतात. त्यामुळे अशा प्रणालीची माहिती आणि जागरूकता सर्वसामान्य जनतेमध्ये असणे गरजेचे आहे.
हेही वाचा: Major Flight Accidents in India: भारतातील आतापर्यंतचे सर्वात भीषण विमान अपघात