India-US Trade: भारत आणि अमेरिकेतील व्यापार संबंधांना नवे वळण मिळण्याची शक्यता वाढली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी शनिवारी स्पष्ट केले की, प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार करार (BTA) बाबतच्या चर्चा सकारात्मक आणि सौहार्दपूर्ण वातावरणात सुरू आहेत. त्यांनी सांगितले की भारत आपल्या शेतकरी, मच्छीमार आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या (MSME) हिताचे रक्षण करताच कराराला अंतिम स्वरूप देईल. पियुष गोयल म्हणाले, जोपर्यंत भारतातील शेतकरी, मच्छीमार आणि MSME क्षेत्राचे हित सुरक्षित होत नाही, तोपर्यंत कोणताही करार होणार नाही. आमचा उद्देश केवळ व्यापार वाढवणे नाही, तर भारताच्या स्वावलंबी आणि न्याय्य वाढीला चालना देणे आहे. गोयल यांनी ही भूमिका जीएसटी बचत महोत्सव दरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत मांडली.
भारताच्या वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील अधिकाऱ्यांचे पथक सध्या वॉशिंग्टनमध्ये आहे, जे अमेरिकन समकक्षांशी व्यापार कराराच्या मुद्यांवर सखोल चर्चा करत आहे, असंही गोयल यांनी म्हटलं आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये भारत आणि अमेरिकेच्या नेत्यांनी BTA वर चर्चेचा वेग वाढवण्याचे निर्देश दिले होते. आतापर्यंत पाच फेऱ्या पूर्ण झाल्या असून, ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 पर्यंत पहिला टप्पा पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
हेही वाचा -Diwali Bank Holidays: दिवाळीत बँका किती दिवस बंद राहणार?, जाणून घ्या
भारताच्या निर्यातीत सातत्याने वाढ
अमेरिकेच्या आयात शुल्कामुळे आव्हाने असतानाही भारताच्या वस्तू आणि सेवांच्या निर्यातीत वाढ होत असल्याचे गोयल यांनी सांगितले. चालू आर्थिक वर्ष 2025-25 च्या एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान, निर्यात जवळपास 5 टक्के वाढून 413.3 डॉलर्स अब्ज झाली आहे. त्याच काळात माल निर्यातीतही 3 टक्के वाढ होऊन ती 220.12 अब्ज झाली आहे. गोयल म्हणाले, जगभरात भारताच्या वस्तू आणि सेवांची मागणी वाढत आहे. या वर्षातही निर्यातीत सकारात्मक वाढ होईल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.
हेही वाचा - Asim Munir Threat to India: 'पाकिस्तान भारताला प्राणघातक प्रत्युत्तर देईल...'; असीम मुनीर यांची भारताला पुन्हा धमकी
जीएसटी सुधारणेमुळे अर्थव्यवस्थेला नवी चालना
जीएसटी दर कपातीविषयी बोलताना मंत्री म्हणाले की, जीएसटी सुधारणा अर्थव्यवस्थेला गती देईल आणि जागतिक आर्थिक दडपणांवर मात करण्यास मदत करेल. त्यांच्या मते, जीएसटी दरकपातीमुळे ग्राहकांची मागणी वाढेल, गुंतवणुकीत वाढ होईल आणि उद्योगांना नवी ऊर्जा मिळेल. काही ई-कॉमर्स कंपन्यांनी दरकपातीचे फायदे ग्राहकांना दिले नाहीत का, असा प्रश्न विचारला असता गोयल म्हणाले, बहुतेक सर्व कंपन्यांनी ग्राहकांना लाभ दिले आहेत. पण जर कोणत्याही प्लॅटफॉर्मने तसे केले नाही, तर ग्राहक व्यवहार विभागाकडे तक्रार दाखल करा. संबंधित कंपनीवर कारवाई करण्यात येईल.