Girl Burnt in Sambhar : नियतीचा खेळ किती क्रूर असू शकतो, याचा प्रत्यय देणारी एक धक्कादायक घटना खम्मम जिल्ह्यातील वायरा गावातून समोर आली आहे. घरात सुरू असलेल्या आनंदाच्या कार्यक्रमात खेळता खेळता एक तीन वर्षांची चिमुकली उकळत्या सांबारच्या टोपामध्ये पडली. तब्बल एक महिना मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर या चिमुरडीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. रम्यश्री मुनगाला असे या मृत मुलीचं नाव होतं.
आनंदाच्या कार्यक्रमावर शोककळा
ही घटना 18 डिसेंबर रोजी घडली. रम्यश्रीचे वडील सिंहाद्रि आणि आई सरोजिनी यांनी घरी एका धार्मिक प्रार्थना सभेचे आयोजन केले होते. नातेवाईक आणि ग्रामस्थांच्या भोजनासाठी घराच्या अंगणात मोठ्या चुलीवर सांबार उकळत होते. घरातील पायऱ्यांजवळ रम्यश्री इतर मुलांसोबत बागडत होती. खेळता खेळता अचानक तिचा तोल गेला आणि ती थेट उकळत्या सांबारच्या टोपामध्ये पडली. कोणाला काही कळण्याच्या आतच ही दुर्घटना घडली. तिला बाहेर काढेपर्यंत गरम सांभरमुळे तिचे शरीर 70 ते 80 टक्क्यांहून अधिक भाजले गेले होते.
हेही वाचा - आश्चर्य! आजीला नवीन लुगडं नेसवलं, हात-पाय बांधले...; अंत्यविधी होणार इतक्यात आजीनं दीर्घ श्वास घेतला...
दरम्यान, घटनेनंतर तातडीने तिला हैदराबाद येथील प्रसिद्ध निलोफर रुग्णालयात हलवण्यात आले. महिनाभर रम्यश्रीने अतिशय धैर्याने मृत्यूशी लढा दिला. डॉक्टरांच्या पथकाने तिला वाचवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले, मात्र भाजल्याची तीव्रता अधिक असल्याने उपचारांना प्रतिसाद मिळणे कठीण झाले. अखेर, महिनाभर सुरू असलेला हा जीवन-मरणाचा संघर्ष थांबला आणि रम्यश्रीने अखेरचा श्वास घेतला.
हेही वाचा - Toothpaste Controversy : पोलिसांनी टूथपेस्ट परत न केल्याचा वाद पोहोचला कोर्टात, माजी IPS अधिकाऱ्याची तक्रार, काय आहे नेमकं प्रकरण?
कुटुंबाचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश
आमची लेक पुन्हा घरी येईल आणि अंगणात बागडेल, ही आई-वडिलांची आस अपुरीच राहिली. तिच्या मृत्यूची बातमी गावात पोहोचताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. आपल्या लाडक्या लेकीचा असा अंत पाहून आई-वडिलांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे काळीज चिरणारा होता. घरात किंवा सार्वजनिक ठिकाणी मोठी स्वयंपाकाची कामे सुरू असताना लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवणे किती गरजेचे आहे, हे या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.