Tuesday, February 17, 2026 06:16:05 PM

Republic Day 2026: चित्ररथासाठी परवानगी अन् डिझाइन कोण ठरवतं ? वाचा दिल्लीत प्रजासत्ताक दिनी दिसणार चित्ररथाची 'इनसाईड स्टोरी'

यंदाची परेड 'वंदे मातरम' या विशेष थीमवर आधारित आहे. मात्र, या दिमाखदार सोहळ्यात कोणत्या राज्याचा चित्ररथ झळकणार, हे ठरवण्यामागे एक अत्यंत क्लिष्ट आणि तांत्रिक प्रक्रिया असते.

republic day 2026 चित्ररथासाठी परवानगी अन् डिझाइन कोण ठरवतं  वाचा दिल्लीत प्रजासत्ताक दिनी दिसणार चित्ररथाची इनसाईड स्टोरी

Republic Day 2026: भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या दिवशी 'कर्तव्य पथा'वर देशाचे सशस्त्र दल आपले शौर्य दाखवत असतानाच, विविध राज्ये आणि सरकारी विभागांचे चित्ररथ (झांकी) आकर्षणाचे केंद्र ठरतात. यंदाची परेड 150व्या वर्धापन दिनानिमित्त 'वंदे मातरम' या विशेष थीमवर आधारित आहे. मात्र, या दिमाखदार सोहळ्यात कोणत्या राज्याचा चित्ररथ झळकणार, हे ठरवण्यामागे एक अत्यंत क्लिष्ट आणि तांत्रिक प्रक्रिया असते.

झांकी निवडीची जबाबदारी आणि तज्ज्ञ समिती

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमधील चित्ररथांची निवड करण्याची संपूर्ण जबाबदारी संरक्षण मंत्रालयाकडे असते. दरवर्षी मंत्रालयाकडे हजारो प्रस्ताव येतात, परंतु वेळेच्या मर्यादेमुळे केवळ निवडक राज्यांनाच संधी मिळते. यासाठी संरक्षण मंत्रालय कला, संस्कृती, इतिहास आणि डिझाइन क्षेत्रातील तज्ज्ञांची एक उच्चस्तरीय समिती स्थापन करते. ही समिती प्रस्तावांची काटेकोर तपासणी करून अंतिम निर्णय घेते.

अर्जापासून परेडपर्यंतचे 'सहा' टप्पे

चित्ररथाची निवड ही एका रात्रीत होणारी प्रक्रिया नसून ती अनेक महिने चालते:

संकल्पना आणि रेखाचित्र: सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये संरक्षण मंत्रालय थीम जाहीर करते. त्यानंतर राज्ये आपली संकल्पना आणि रेखाचित्रे सादर करतात.
मूल्यांकन: तज्ज्ञ समिती थीमची प्रासंगिकता तपासून प्रस्तावांना मंजुरी किंवा नापसंती देते.
3D मॉडेल सादरीकरण: प्राथमिक मंजुरी मिळालेल्या राज्यांना त्यांच्या चित्ररथाचे ३D मॉडेल सादर करावे लागते, जेणेकरून तो प्रत्यक्ष परेडमध्ये कसा दिसेल याचा अंदाज येतो.
सुधारणा आणि तांत्रिक आढावा: समिती मॉडेल्सची पाहणी करून आकार, डिझाइन किंवा तांत्रिक बाबींमध्ये सुधारणा सुचवते.
अंतिम यादी: सर्व निकषांवर उतरणाऱ्या राज्ये आणि विभागांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाते. यंदा 17 राज्ये आणि 13 विभागांची निवड झाली आहे.
चाचण्या आणि तालीम: शेवटच्या टप्प्यात यांत्रिक चाचण्या आणि सुरक्षा तपासणी केली जाते, जी 26 जानेवारीच्या मुख्य सोहळ्याची रंगीत तालीम असते.

हेही वाचा - Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी दिसणार महाराष्ट्राचं वैभव, बाप्पाचा सुरेख देखावा आणि...; जाणून घ्या कसा असणार चित्ररथ?

'सर्वोत्तम चित्ररथ' किताब कसा मिळतो?

परेड संपल्यानंतर सहभागी झालेल्या सर्व चित्ररथांमधून 'सर्वोत्तम झांकी' निवडली जाते. यासाठी उच्च-स्तरीय ज्युरी नेमली जाते. हा किताब मिळवण्यासाठी केवळ देखावा सुंदर असून चालत नाही, तर त्यासाठी खालील निकष लावले जातात: 
- विषयाची (Theme) सुसंगतता आणि संदेश. 
- सर्जनशीलता आणि कलात्मक मांडणी.  
- तांत्रिक अचूकता, संगीत आणि प्रकाश योजना. 
- सहभागी कलाकारांचे पोशाख आणि सादरीकरण.

यामध्ये राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि मंत्रालय अशा विविध श्रेणींमध्ये पुरस्कार दिले जातात. विशेष म्हणजे, लोकमतानुसार 'लोकप्रियता पुरस्कार' देखील दिला जातो. परेड संपल्यानंतर हे चित्ररथ देशातील विविध शहरांमध्ये प्रदर्शनासाठी पाठवले जातात, जेणेकरून सर्व नागरिकांना हे कलाविष्कार जवळून पाहता येतील.


सम्बन्धित सामग्री