Friday, March 13, 2026 11:18:24 PM

IND vs SA: संजू सॅमसनचं होणार पुनरागमन? अभिषेक-तिलकच्या फ्लॉप शोनंतर प्रशिक्षकांच्या विधानाने खळबळ

सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोइशेत यांच्या विधानानंतर संजू सॅमसनच्या पुनरागमनाच्या चर्चांना उधाण आले आहे.

ind vs sa संजू सॅमसनचं होणार पुनरागमन अभिषेक-तिलकच्या फ्लॉप शोनंतर प्रशिक्षकांच्या विधानाने खळबळ

IND vs SA:  दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अत्यंत महत्त्वाच्या सुपर 8 सामन्यात 188 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला 76 धावांनी मोठा पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात युवा फलंदाज अभिषेक शर्मा (15 धावा) आणि तिलक वर्मा (0 धावा) सपशेल अपयशी ठरल्याने आता संघात बदलाचे वारे वाहू लागले आहेत. विशेषतः सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोइशेत यांच्या विधानानंतर संजू सॅमसनच्या पुनरागमनाच्या चर्चांना उधाण आले आहे.

सलामीची जोडी ठरतेय चिंतेचा विषय
सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोइशेत यांनी भारताच्या खराब सुरुवातीबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, "गेल्या 5 पैकी 4 सामन्यांत आपण पहिल्याच षटकात विकेट गमावली आहे. डावाची सुरुवातच विकेटने झाल्यामुळे उर्वरित फलंदाजांवर नाहक दबाव येतो. आपल्या संघात सध्या अनुभवाचा अभाव दिसून येत असून, आपल्याला एका स्थिर प्लेइंग इलेव्हनची गरज आहे." इशान किशनला या विश्वचषकात चांगली लय सापडली असली, तरी त्याला दुसऱ्या टोकाकडून अपेक्षित साथ मिळत नसल्याचे चित्र आहे.

संजू सॅमसनला मिळणार संधी?
अभिषेक आणि तिलक यांच्या निराशाजनक कामगिरीनंतर संजू सॅमसनला संघात स्थान मिळण्याचे संकेत प्रशिक्षकांनी दिले आहेत. रायन यांनी स्पष्ट केले की, "आमच्यासमोर आता 2 पर्याय आहेत- एक तर खराब फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंना साथ देणे किंवा संजू सॅमसनसारख्या अनुभवी खेळाडूला संधी देणे. संजूच्या आगमनामुळे वरच्या फळीत एक उजव्या हाताचा फलंदाज (Right-handed batsman) मिळेल, जो संघासाठी फायदेशीर ठरू शकतो. पुढील 2 महत्त्वाच्या सामन्यांपूर्वी हा आमच्यासाठी चर्चेचा मुख्य विषय असेल."

हेही वाचा - T20 World Cup: दक्षिण आफ्रिकेकडून 'फटका'; आता झिम्बाब्वे-विंडीज सोबतच्या सामन्यांचे टेन्शन, टीम इंडियात मोठ्या फेरबदलांचे संकेत

अभिषेक की तिलक; कोणाचा पत्ता कट होणार?
2026 चा विश्वचषक अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा या दोघांसाठीही आतापर्यंत कठीण गेला आहे. दुसरीकडे, संजू सॅमसनने नामिबियाविरुद्धच्या संधीचा फायदा घेत 8 चेंडूत 22 धावांची आक्रमक खेळी केली होती आणि तो नेटमध्येही चांगल्या टचमध्ये दिसत आहे. त्यामुळे झिम्बाब्वेविरुद्धच्या आगामी सामन्यात अभिषेक किंवा तिलक यांपैकी एकाला डच्चू देऊन संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.


सम्बन्धित सामग्री