मुंबई: वूमन्स प्रीमियर लीगच्या (WPL) चौथ्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) विजयी अश्वमेध रोखणं सध्या तरी प्रतिस्पर्ध्यांना अशक्य भासत आहे. शुक्रवारी, 16 जानेवारी रोजी झालेल्या अटीतटीच्या लढतीत आरसीबीने गुजरात जायंट्सचा 32 धावांनी धुव्वा उडवत विजयाची ‘हॅट्ट्रिक’ साजरी केली. श्रेयांका पाटीलची भेदक गोलंदाजी आणि फलंदाजांच्या सांघिक कामगिरीच्या जोरावर बंगळुरूने गुणतालिकेतील आपलं अव्वल स्थान अधिक भक्कम केलं आहे. मात्र, विजय मिळवूनही ‘नेट रनरेट’च्या विचित्र गणितामुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे सूर उमटत आहेत.
राधा - ऋचाची फटकेबाजी आणि श्रेयांकाचा ‘धमाका’
प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने धावफलकावर 182 धावांचे टार्गेट उभा केले होते. यात राधा यादवने 66 धावांची तडाखेबंद खेळी करत डावाला आकार दिला, तर ऋचा घोषने 44 धावांचे योगदान दिले. 183 धावांच्या या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातची दाणादाण उडाली. आरसीबीची फिरकीपटू श्रेयांका पाटीलने प्रतिस्पर्ध्यांच्या फलंदाजीचं कंबरडं मोडत पाच बळी टिपले. श्रेयांकाच्या या ‘पंचका’मुळे गुजरातचा डाव 18.5 षटकांत 150 धावांवरच आटोपला.
हेही वाचा: Nashik Election Result 2026: महाजन ठरले संकटमोचक अन् किंगमेकर; नाशिकच्या विजयामागे गिरीश महाजनांनी कसं फिरवलं चक्र?
विजयाचा आनंद, पण रनरेटचं गणित बिघडलं!
आरसीबीने सलग तीन सामने जिंकून सहा गुणांसह अव्वल स्थान गाठलं असलं तरी, एक विचित्र आकडेवारी समोर आली आहे. यूपी वॉरियर्स विरुद्धच्या मागील सामन्यात आरसीबीने 144 धावांचे लक्ष्य अवघ्या 12.1 षटकांत पूर्ण केलं होतं, ज्यामुळे त्यांचा नेट रनरेट +1.964 वर पोहोचला होता. मात्र, गुजरात विरुद्ध धावांचा बचाव करताना विजय मिळवूनही आरसीबीचा रनरेट घसरून +1.828 झाला आहे. क्रिकेटमधील रनरेटचं गणित हे तुम्ही किती चेंडू राखून जिंकता यावर अवलंबून असतं, त्यामुळे मोठ्या फरकाने विजय मिळवूनही सरासरीत झालेली ही घट चाहत्यांसाठी आश्चर्याचा धक्का ठरली आहे.
आज पुन्हा ‘रणसंग्राम’; समोर दिल्लीचं आव्हान!
विजयाचा गुलाल उधळल्यानंतर आरसीबीला विश्रांतीसाठी उसंतही मिळालेली नाही. आज, शनिवारी 17 जानेवारीला आरसीबीचा सामना बलाढ्य दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. सलग चौथा विजय मिळवून प्ले ऑफच्या दिशेने कूच करण्याचा आरसीबीचा मानस असेल. गुणतालिकेत आपली पकड मजबूत ठेवण्यासाठी आणि रनरेटमधील झालेली घसरण भरून काढण्यासाठी स्मृती मानधनाच्या शिलेदारांना आज पुन्हा एकदा मैदानात ‘आर पार’ची लढाई लढावी लागणार आहे.
हेही वाचा: Malegaon Election Result 2026 : मालेगाव महापालिकेच्या निकालामुळे राजकारणात मोठी उलथापालथ; भाजपाचा दारुण पराभव, विजयी उमेदवार जाहीर