महाकुंभ मेळ्यासाठी देश तसेच विदेशातून मोठ्या संख्येने भाविक प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत. परिणामी, उत्तर प्रदेशच्या सीमांवर आणि महामार्गांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. यात सर्वाधिक भाविक हे मध्य प्रदेशमधून येत असल्याचे दिसून येत आहे. भाविकांच्या वाहनांमुळे मध्य प्रदेशात २०० ते ३०० किलो मीटरपर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे सांगितले जात आहे. या वाहतूक कोंडीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यूजर हा जगातील सर्वात मोठा ‘ट्रॉफिक जॅम’ असल्याच्या प्रतिक्रिया देत आहेत.
उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या सीमांवर भाविकांच्या वाहनांची प्रचंड गर्दी झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी १२ ते १५ तास अडकून पडले आहेत. यात वयोवृद्ध, महिला आणि लहान मुलांचे मोठे हाल होत आहेत. अन्न, पाणी आणि औषधांचा तुटवडा जाणवत असून अनेक प्रवासी हैराण झाले आहेत.
हेही वाचा - 20 वर्षांपूर्वी त्सुनामीनंतर या IAS अधिकाऱ्याने 'तिला' ढिगाऱ्यातून उचलून आणलं; आता तिच्या लग्नाला हजर राहिले
वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यात सोमवारीपर्यंत पोलिसांच्या वाहनांद्वारे वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मैहर जिल्ह्यातील पोलिसांनी वाहनांना कटनी आणि जबलपूरकडे परत जाण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय गर्दीचा अंदाज घेत प्रयागराजचे संगम रेल्वे स्टेशन १४ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. रेल्वे तिकिटे सहज उपलब्ध नसल्याने अनेक भाविक खासगी वाहनांतून महाकुंभासाठी प्रयागराजला येत आहेत. त्यामुळे शहरातील आणि महामार्गांवरील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
हेही वाचा - आता महिलांना सूर्यास्तानंतरही अटक करता येणार; मद्रास उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
अखिलेश यादवांची योगी सरकारवर टीका
समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी या विषयावरून उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित वाहतूक कोंडीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर संताप व्यक्त केला आहे. प्रयागराजमध्ये अन्नधान्य, भाजीपाला, मसाले, औषधे, पेट्रोल-डिझेल मिळत नाही. यामुळे, प्रयागराज आणि महाकुंभ परिसरात आणि प्रयागराजकडे जाणाऱ्या रस्त्यांवर अडकलेल्या कोट्यावधी भुकेल्या, तहानलेल्या, थकलेल्या भाविकांची अवस्था प्रत्येक तासाला बिकट होत चालली आहे. ही एक अतिशय गंभीर परिस्थिती आहे, असे अखिलेश यादव यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान, प्रयागराज महाकुंभात भाविकांची गर्दी सतत वाढत आहे. गर्दी पाहून प्रशासन सतर्क झाले आहे.