मुंबई: चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्यासाठी तरुणांमध्ये स्पर्धा निर्माण झालेली असताना त्यासाठी आवश्यक शिक्षण पूर्ण करण्यासाठी लाखों रुपये खर्च करावे लागतात. एवढं सगळं करूनही पाहिजे तसा जॉब तरुणांना मिळत नाही. या बाबत झोहोचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर वेंबू यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की नोकरी मिळवण्यासाठी पदवीपेक्षा कौशल्य अधिक महत्त्वाचे आहे. देशात लाखो विद्यार्थी IIT, IIM किंवा परदेशातील प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे मेहनत घेतात. काही जण यशस्वी होतात, परंतु अनेकांना अपेक्षित निकाल मिळत नाही आणि त्यामुळे त्यांच्यावर कुटुंबाकडून मोठा मानसिक ताण येतो. या पार्श्वभूमीवर वेंबू यांनी पालकांना महत्त्वाचा संदेश दिला “मुलांवर पदवी घेण्याचा दबाव आणू नका.”
ही चर्चा त्या वेळी सुरू झाली, जेव्हा अमेरिकेतील पॅलन्टिअर या तंत्रज्ञान कंपनीने कॉलेज न करता थेट हायस्कूल पदवीधरांना मोठ्या तांत्रिक आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित प्रकल्पांवर काम करण्यासाठी आमंत्रित केले. या अनोख्या उपक्रमासाठी पाचशे युवकांनी अर्ज केला, त्यापैकी बावीस जणांची निवड झाली. काहींनी तर आयव्ही लीग संस्थांचे प्रवेशपत्र आणि पूर्ण शिष्यवृत्तीही नाकारली. या पोस्टवर प्रतिक्रिया देताना वेंबू म्हणाले की, “अमेरिकेतील हुशार विद्यार्थी आता कॉलेजला जाण्याऐवजी थेट कामाचा मार्ग निवडत आहेत, आणि दूरदृष्टी असलेल्या कंपन्याही त्यांना प्रोत्साहन देत आहेत.”
हेही वाचा: Indigo Flight Service: कॅन्सलेशननंतर IndiGo ची मोठी घोषणा; आज 1500 हून अधिक फ्लाइट्स रुटीनमध्ये
त्यांनी असेही सांगितले की हा बदल तरुणांना मोठ्या कर्जाच्या ओझ्यापासून वाचवतो आणि ते स्वतःच्या पायावर उभे राहण्यास सक्षम बनतात. भारतातही अनेक कुटुंबे मुलांच्या शिक्षणासाठी लाखो रुपयांचे कर्ज घेतात, पण अपेक्षित नोकरी न मिळाल्यास संकट अधिकच वाढते. वेम्बू यांनी झोहोच्या भरती धोरणाबाबतही महत्त्वाचे वक्तव्य केले. “झोहोमध्ये कोणत्याही नोकरीसाठी कॉलेजची पदवी आवश्यक नाही. एखाद्या पदासाठी पदवीची अट टाकली गेली तर HR त्या व्यवस्थापकाला ती अट काढून टाकण्याची विनंती करतात,” असे त्यांनी सांगितले.
त्यांच्या मते, प्रतिभा आणि शिकण्याची तयारी हीच खरी पात्रता आहे. ते स्वतः तेनकासीमध्ये ज्या तरुण टीमसोबत काम करतात, त्यांचा वयोगट फक्त 19 वर्षे आहे. “त्यांची ऊर्जा आणि ‘जॉब करून दाखवू’ वृत्ती अतिशय प्रेरणादायी आहे. त्यांच्या वेगाशी जुळून घेण्यासाठी मला देखील मेहनत घ्यावी लागते,” असे वेंबू सांगतात.
झोहोसारख्या कंपन्या पदवीच्या अटी काढून टाकून मोठ्या प्रमाणात तरुणांना नवी संधी देत आहेत. कौशल्याधारित भरतीमुळे अनेक तरुणांना, विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना, उच्च शिक्षणाचा खर्च न करता करिअर घडवण्याचा मार्ग उघडत आहे. वेम्बूंच्या या वक्तव्यामुळे शिक्षण आणि नोकरी क्षेत्रातील सुरू असलेल्या बदलांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे. भविष्यात नोकरी बाजारात पदवीपेक्षा कौशल्य आणि कामगिरीचं महत्त्व वाढत जाणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
हेही वाचा: PM Narendra Modi: बँकांमध्ये 78 हजार कोटी रुपये दाव्याअभावी अडकून; बेवारस निधीवर मोदींनी व्यक्त केली चिंता