Mon. Aug 15th, 2022

इंदोरीकर महाराजांच्या गाडीला अपघात

प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या चारचाकी वाहनाचा परतूरजवळ अपघात झाला आहे. या अपघातात त्यांच्या चालकाला किरकोळ इजा झाली असल्याची माहिती आहे.

काल ते जालना जिल्ह्यातील खांडवीवाडी येथून किर्तनासाठी जात असताना परतूर येथे एका वळणावर त्यांच्या स्कार्पिओ गाडीची लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला धडक बसली. या अपघातात इंदोरीकर महाराजांना कोणतीही इजा झाली नाही, मात्र गाडीचा चालक किरकोळ जखमी झाला आहे. परतूर तालुक्यातील खांडवीवाडी इथं कीर्तनासाठी जात असताना साईनाथ कॉर्नरवरील हॉटेल मधूबन समोर रस्ता क्रॉस करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर आदळून हा अपघात झाला आहे. बुधवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती देण्यात आली आहे. एमएच १२ टीवाय १७४४ या क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओने ते प्रवास करत होते. या अपघाताची माहिती मिळताच परतूरचे पोलिस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे घटनास्थळावर दाखल झाले.

जखमी चालकाला पोलिसांच्या मदतीने शहरातील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. सत्यानंद कराड यांच्या सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांनी दिली आहे. अपघातस्थळावरून इंदोरीकर महाराज यांना दुसऱ्या वाहनाने खांडवीवाडी येथे पोहोचवण्यात आले. या ठिकाणी त्यांचे कीर्तन नियोजित वेळेत पार पडले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.