Sat. Jul 4th, 2020

… तर किर्तन सोडून शेती करेन – इंदुरीकर महाराज

मला मागील चार दिवस प्रचंड मनस्ताप झाला आहे. अवघ्या दोन तासांच्या किर्तनात एखादं दुसरं चुकीचं वाक्य जाऊ शकतं, असं म्हणत इंदुरीकर महाराजांनी आपली बाजू मांडली आहे.

पुत्रप्राप्तीबाबत मी जे काही बोललो ते काही ग्रंथांमध्ये लिहिलं आहे .हा सुरु असलेला सर्व प्रकार थांबला नाही, तर एक दोन दिवस बघेन आणि किर्तन सोडून शेती करेन अशी उद्विघन आणि हताश प्रतिक्रिया इंदुरीकर महाराजांनी दिली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

काही दिवसांपूर्वी इंदुरीकर महाराजांनी किर्तनादरम्यान पुत्रप्राप्तीचा सम विषम फॉर्म्युला सांगितला होता. या फॉर्म्युल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले.

” सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते ” असे विधान इंदुरीकर महाराजांनी केलं होतं.

त्यांनी केलेल्या विधानामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. इंदुरीकर महाराजांनी केलेलं वक्तव्य हे PCPNDT कायद्याचं उल्लंघन केलं. या कायद्यानुसार त्यांना नोटीस पाठवली.

किर्तनकार इंदुरीकर महाराज त्यांच्या हटके स्टाईल किर्तनासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या किर्तनाची शैली ही स्टॅंडअप कॉमेडीशी मिळती जुळती आहे. इंदूरीकर महाराज आपल्या किर्तनातून सद्यपरिस्थितीवर विनोदात्मक शैलीतून भाष्य करतात.

इंदुरीकर महाराजांचा सोशल मीडियावर स्वत:चा असा फॅनबेस आहे. टीकटॉकवर त्यांच्या आवाजातले डब केलेले व्हिडिओ तर धुमाकूळ घालतात.

दरम्यान या सर्व प्रकरणावरुन इंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ नेटीझन्स सरसावले आहेत. इंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अनेक पोस्ट्स केल्या जात आहेत.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *