तुर्कीच्या राष्ट्रपतींचा WhatsApp वर बहिष्कार

अंकारा: व्हॉट्सअॅपने आपल्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये बदल केल्यानं युजर्समध्ये नाराजीचे वातावरण आहे. शिवाय या नव्या धोरणांमुळे आता तुर्कीच्या राष्ट्रपतींनी व्हॉट्सअॅपवर बहिष्कार घातला आहे. राष्ट्रपती रेचप तैयप एर्दोगन यांच्या माध्यम कार्यालयाने व्हॉटसअॅप सोडण्याचे जाहीर केले आहे. इतकंच नव्हे तर संरक्षण खात्यानेही व्हॉटसअॅप न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. व्हॉट्सअॅपच्या नव्या पॉलिसीमुळे राष्ट्रपतींनी व्हॉटसअॅप सोडण्याचे जाहीर केल्यानंतर तुर्कीत या अमेरिकन सोशल मीडियाविरोधात आवाज तीव्र झाला आहे.

ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रपती एर्दोगन यांनी ११ जानेवारी रोजी आपले व्हॉटसअॅप ग्रुप एन्क्रिप्टेड मेसेजिंग अॅप BiPवर बनवण्याचे निर्देश दिले आहेत. BiP हा तुर्कीचा एक एन्क्रिप्टेड मेसेजिंग अॅप असून याची मालकी ही टर्कसेल इलेटिसिम हिजमेटलरी एएसकडे आहे. सर्वांनाच या मेसेजिंग अॅपवर अकाउंट सुरू करण्याचे निर्देश राष्ट्रपती कार्यालयाकडून मिळण्याची शक्यता आहे. तुर्कीत व्हॉटसअॅप सोडून BiPवर नव्याने अकाउंट सुरू करण्यात येत आहेत. रविवारी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, २४ तासांत जवळपास १० लाखजणांनी अॅप डाउनलोड केले आहे. हे अॅप २०१३ मध्ये लाँच करण्यात आले होते. त्यानंतर आतापर्यंत जवळपास ५३ दशलक्षाहून अधिक वेळा डाउनलोड करण्यात आले आहे.

Exit mobile version