रश्मी शुक्ला यांची चौकशी राहत्या घरी होणार

फोन टॅपिंगप्रकरणी दोन वेळा समन्स बजावूनही बीकेसी सायबर सेल पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर न राहणाऱ्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची चौकशी त्यांच्या हैदराबाद येथील राहत्या घरी करण्याची परवानगी उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिली आहे. तसेच या चौकशीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याची मुभाही पोलिसांना दिली. यादरम्यान त्यांच्यावर कठोर कारवाई करणार नाही, असे आश्वासन राज्य सरकारने उच्च न्यायालयाला गुरुवारी दिले.

कोरोनामुळे रश्मी शुक्ला दोन्ही वेळी मुंबईत येऊ शकल्या नाहीत, असे शुक्ला यांच्या वतीने ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. मनिष पितळे यांच्या खंडपीठाला सांगितले.

‘शुक्ला यांना मुंबईत येणे जमत नसेल तर आम्ही मुंबईतून पोलिसांचे एक पथक हैदराबाद येथे त्यांची चौकशी करण्यासाठी पाठवू. शुक्ला यांनी पोलिसांना पूर्ण सहकार्य करावे. तसेच आम्ही त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करू. न्यायालयाने आम्हाला परवानगी द्यावी. चौकशीवेळी त्यांचे एक वकील त्यांच्याबरोबर उपस्थित असतील. अन्य कोणालाही परवानगी देण्यात येणार नाही’, असे सरकारच्या वतीने ज्येष्ठ वकील डी. खंबाटा यांनी यांनी सांगितले.

Exit mobile version