Sun. Jun 20th, 2021

इराणची आत्मघातकी चूक, गैरसमजातून 176 प्रवाशांचा नाहक बळी

विमान हल्ल्याप्रकरणी इराणने आपली चूक कबूल केली आहे. युक्रेन इंटरनॅशनल एअरलाईन्सचं विमान चुकून क्षेपणास्त्राने पाडल्याची कबुली इराणने (Iran) दिली आहे. या विमान (Flight) दुर्घटनेत 176 प्रवाशांना प्राण गमवावे लागले आहेत.

याआधी तांत्रिक बिघाडामुळे विमान अपघात झाल्याचं इराणने जाहीर केलं होतं. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर या अपघाताच्या चौकशीची मागणी सुरू झाली. दबाव निर्माण झाल्यावर आता इराणने विमान अपघात हा तांत्रिक बिघाडामुळे नव्हे, तर मानवी चुकीमुळे घडला असल्याचं मान्य केलं आहे.

इराण आणि अमेरिकेतील संबंध ताणले गेल्यामुळे इराणने इराकमधील अमेरिकेच्या तळांवर क्षेपणास्त्रांचा मारा केला होता. याच काळात युक्रेन इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या विमानाचा अपघात घडला होता. हा अपघात इराणने डागलेल्या क्षेपणास्त्रामुळे झाल्याचं इराणला आता मान्य करावं लागलंय. (Iran confessed its role in Ukrainian plane crash)

काय घडलं नेमकं?

अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यानंतर इराणने इराकच्या अमेरिकी तळांवर क्षेपणास्त्राने हल्ले केले.

त्याच दिवशी इराणची राजधानी तेहरान येथून युक्रेन इंटरनॅशनल एअरलाईन्सचं PS 752 हे विमान उड्डाण करत होतं.

हे युक्रेनचं विमान अमेरिकेनेच इराणवर हल्ला करण्यासाठी पाठवलं असल्याचा गैरसमज इराणी सैन्याचा झाला आणि हे विमान क्षेपणास्त्राने उद्ध्वस्त करण्यात आलं.

इराणी सैन्याच्या या गैरसमजामुळे 176 प्रवाशांना नाहक प्राण गमवावा लागलाय. यातील बहुसंख्य प्रवासी हे इराणचेच नागरिक होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *