मातोश्री मशीद आहे का? – राज ठाकरे

मागील काही दिवसांमध्ये मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी चांगलेच खडेबोल सुनावले आहे. राणा दाम्पत्य आणि शिवसेना हा वाद गेल्या काही दिवसांमध्ये चांगलाच रंगला होता. तसेच हनुमान चालिसा पठण प्रकरणी राणा दाम्पत्याला तुरुंगवाससुद्धा भोगावा लागला. तर, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू होते. याप्रकरणी राणा दाम्पत्य आणि शिवसनेवर राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेतून निशाणा साधला आहे.
राज ठाकरे म्हणाले, ज्यांना आपलं हिंदुत्व झोंबलं. ते आपल्या विरोधात एकत्र येतात, बाकी वेळी भांडतात. मी मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. भोंगे उतरवले नाही तर मशिदींसमोर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचा इशारा दिला होता. मात्र, राणा दाम्पत्यानी मातोश्रीसमोर हनुमान चालिस पठण करण्याचा अट्टाहास केला. राणा दाम्पत्य मातोश्रीसमोर हनुमान चालिस पठण करण्यासाठी गेले होते. त्यामुळे मातोश्री बंगला काय मशीद आहे का? असा सवाल राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून उपस्थित केला आहे. तसेच राज ठाकरे पुढे म्हणाले, याप्रकरणी राणा दाम्पत्याला कोठडीदेखील सुनावण्यात आली. राणा दाम्पत्याची परिस्थिती मधू इथे चंद्र तिथे अशी होती. त्यानंतर त्यांना जामीन मंजूर झाला. त्यामुळे राणा दाम्पत्य आणि शिवसेना यांच्यात वातावरण चांगलच तापलं.
पुढे ते म्हणाले, हे सर्व झाल्यानंतर आता खासदार नवनीत राणा आणि संजय राऊत लडाखमध्ये एकत्र फिरत आहेत. त्यामुळे राणा आणि राऊत लडाखमध्ये गोड बोलतात, हे शिवसेनेच्या लोकांना खुपत नाही, असाल सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. ज्यांच्यामुळे राज्यात इतकं मोठं प्रकरण तापलं, त्यांच्यासोबत तुम्ही जेवताय, खांद्यावर हात ठेवून फिरताय. त्यामुळे ह्यांचं हिंदुत्व ढोंगी असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली आहे.