Wed. Oct 27th, 2021

इस्रायलमध्ये मास्क वापराच्या निर्बंधांमध्ये शिथिलता

संपूर्ण जग कोरोनाशी लढत असताना एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. इस्रायलने जवळपास वर्षभरानंतर देशभरात लागू असणाऱ्या मास्क वापरातील निर्बंधांमध्ये शिथिलता आणली आहे. देशातील जवळपास ८० टक्के जनतेला लस देण्यात यश मिळवल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. इस्रायलमध्ये रविवारी या निर्णयाची घोषणा करण्यात आली. त्यामुळं कोरोनावर मात करणाऱ्या इस्रायलच्या या लढ्याकडे सारं जग एक आदर्श म्हणून पाहत आहे.

इस्रायलचे आरोग्यमंत्री यूली इडेलस्‍टेइन यांनी दिलेल्या माहितीनुसार, लसीकरणानंतर या ठिकाणी कोरोनाच्या संसर्गाचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी झालं आहे. त्यामुळे निर्बंधांमध्ये मोठ्या प्रमाणात शिथिलता आणण्यास सुरुवात करण्यात आली आहे. नियमांमध्ये शिथिलता आणण्यात आली असली,तरीही इथे कार्यालयांमध्ये मात्र कर्मचाऱ्यांना मास्क वापरणं बंधनकारक असणार आहे. जवळपास ९३ लाखांची लोकसंख्या असणाऱ्या या देशानं आतापर्यंत ५० लाखांहून अधिक जनतेला कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली आहे. इस्रायलमधील टळणारं हे संकट पाहता इथं शाळाही सुरु होण्याच्या मार्गावर आहेत. तर, येत्या काळात इथे पर्यटनासही नव्याने सुरुवात होणार आहे.

लसीकरणामुळं इस्रायलमधील परिस्थिती झपाट्यानं बदलली. रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णाचा आकडा कमी होण्यासोबतच मृतांचा आकडाही लक्षणीयरित्या घटला. जानेवारी महिन्याच्या मध्यापर्यंत या देशात दिवसाला दहा हजार कोरोनाबाधित आढळत होते. आता हेच प्रमाण १०० आणि २०० वर पोहोचलं आहे. मुख्य म्हणजे मोठ्या प्रमाणात नियमांमध्ये शिथिलता आणलेली असतानाही इथे कोरोनाचा संसर्ग कमालीचा नियंत्रणात आहे. त्यामुळे कोरोनाशी दोन हात करण्याचं इस्रायलचं तंत्र आणि रणनीती नक्कीच अनुकरणीय आहे.

इस्रायलमध्ये नागरिकांंपर्यंत लस पोहोचवण्याची मोहीम मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली, आता त्याच धर्तीवर जगातील इतर राष्ट्रांमध्ये असे निर्णय घेत कोरोनाविरोधातील लढा जिंकला जातो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *