म्हणून आयटी क्षेत्रात नोकर कपातीची टांगती तलवार…
जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली
सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ असलेल्या अमेरिकेत एच-१बी व्हिसाविषयक नियमातील कठोरतेतून माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील बडय़ा भारतीय कंपन्यांना नवीन नोकरभरती, वेतनमान आणि कामाचे स्वरूप यात साजेसे बदल अपरिहार्य ठरत असून त्याचा थेट परिणाम भारतातील नोकरदारांवर दिसून येणार असल्याचा इशारा असोचॅमने दिला आहे.
आधीच अमेरिकेतील घडामोडी आणि बदललेल्या व्हिसा नियमामुळे खर्चात वाढीने नफ्याच्या मार्जिनला कात्री लावली आहे. त्याची भरपाई कर्मचारी वर्ग कमी करून केली जाईल.
इन्फोसिस, विप्रो. टीसीएस या भारतीय कंपन्यांपाठोपाठ कॉग्निझन्टनेही सहा ते दहा हजार नोकरदार कमी करण्याचे संकेत दिले आहेत. सिस्कोने या वर्षांत मनुष्यबळ 7 टक्कय़ांनी कमी करण्याचे, तर आयबीएमने पाच हजार कर्मचाऱ्यांच्या कपातीचे नियोजन यापूर्वीच जाहीर केले आहे.
‘झिनोव’ या संस्थेच्या अंदाजाप्रमाणे येत्या चार वर्षांत नवीन तंत्रज्ञानामुळे केवळ भारताच्या आयटी क्षेत्रातून 94 हजारच्या घरात नोकऱ्या लुप्त होतील.