डोंबिवली नागरी सहकारी बँक लि. यांना 'किरकोळ (रिटेल) बँकिंगमधील उत्कृष्ट तंत्रज्ञान अंमलबजावणी' या श्रेणीत प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार 30 व 31 जानेवारी 2026 रोजी नोवोटेल हॉटेल, इमॅजिका, खोपोली येथे आयोजित को-ऑपरेटिव्ह बँक्स टॉप 100 समिट व आयकॉनिक लीडर अवॉर्ड 2026 या राष्ट्रीय स्तरावरील परिषदेत प्रदान करण्यात आला.
या परिषदेत देशभरातील अग्रगण्य सहकारी बँका, बँकिंग व वित्त क्षेत्रातील तज्ज्ञ, धोरणकर्ते तसेच तंत्रज्ञान क्षेत्रातील नेतृत्व सहभागी झाले होते. सहकारी बँकिंग क्षेत्रातील नवोन्मेष, उत्कृष्ट कार्यपद्धती आणि नेतृत्वगुण यांचा गौरव करण्यासाठी या समिटचे आयोजन करण्यात आले होते.
सदर पुरस्कार श्री. पराग नवरे, चीफ क्रेडिट ऑफिसर (CCrO) आणि श्री. अनुराग पाटील, चीफ इन्फॉर्मेशन ऑफिसर (CIO) यांनी स्वीकारला. किरकोळ बँकिंग क्षेत्रात आधुनिक डिजिटल प्रणालींची यशस्वी अंमलबजावणी करण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. यामध्ये ऑनलाईन केवायसी पडताळणी पोर्टल, CASA तसेच कर्ज खात्यांसाठी केंद्रीकृत खाते उघडण्याची प्रणाली, स्कोअरकार्ड-आधारित कर्ज मूल्यांकन प्रणाली तसेच LOS (Loan Origination System) आधारित कर्ज प्रक्रिया व मंजुरी प्रणाली यांचा समावेश आहे.
या प्रगत तंत्रज्ञान अंमलबजावणीमुळे बँकेची कार्यक्षमता वाढली असून पतनिर्णय प्रक्रिया अधिक अचूक व सक्षम झाली आहे. तसेच कर्ज प्रक्रिया व ग्राहक ऑनबोर्डिंगसाठी लागणारा *टर्नअराउंड टाइम (TAT) लक्षणीयरीत्या कमी होऊन ग्राहकांना जलद व पारदर्शक सेवा मिळू लागली आहे.
या यशाबद्दल डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या व्यवस्थापनाने समाधान व्यक्त केले असून, भविष्यातही सातत्यपूर्ण नवकल्पना, डिजिटल उत्कृष्टता आणि ग्राहककेंद्रित बँकिंग सेवा देण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. सहकारी बँकिंगची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देणे हेच बँकेचे ध्येय असल्याचे व्यवस्थापनाने नमूद केले.