Friday, December 05, 2025 02:49:12 AM

Gold Price Prediction: सोन्याच्या दरातील हा उलटफेर किती दिवस टिकणार? नवीन वर्षातील किंमतीवर तज्ज्ञांचा मोठा दावा

दिवाळीनंतर सोन्याचे दर कमी झाले असले तरी पुढील काही महिन्यांत मोठी वाढ होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते नवीन वर्षात सोनं 10 ते 20 टक्क्यांनी महागू शकतं. गुंतवणूकदारांसाठी हा काळ महत्त्वाचा ठरणार आहे.

gold price prediction सोन्याच्या दरातील हा उलटफेर किती दिवस टिकणार नवीन वर्षातील किंमतीवर तज्ज्ञांचा मोठा दावा

Gold Price Prediction: सोन्याच्या दरात गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या चढ-उतारांमुळे गुंतवणूकदार, ज्वेलर्स आणि ग्राहक यांच्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवाळीच्या काळात दरांनी उच्चांक गाठल्यानंतर त्यात अचानक घट दिसून आली. सणांच्या दिवसांपासून बाजारात बुल रन कमी होत असल्याची चिन्हे स्पष्ट दिसत होती. मात्र आता पुन्हा एकदा सोन्याच्या किमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या काही महिन्यांत सोन्याच्या दरात महत्त्वाची उडी पाहायला मिळू शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

गेल्या काही काळात आंतरराष्ट्रीय व्यवहार, डॉलरमधील अस्थिरता, जागतिक मध्यवर्ती बँकांची खरेदी आणि भूराजकीय परिस्थिती यांच्या परिणामामुळे सोन्याच्या किमतीत वेगाने बदल झाले. दिवाळीनंतर दरात झालेल्या घटेमुळे सुमारे ८ हजार रुपयांपर्यंत सोनं स्वस्त झाले. परंतु ही घसरण तात्पुरती असून, पुढील काही महिन्यांत दर पुन्हा वाढणार असल्याचे उद्योगातील जाणकारांचे म्हणणे आहे.

ज्वेलरी उद्योगाशी निगडित वरिष्ठ उद्योजकांच्या मते, या वर्षी दागिन्यांच्या खरेदीपेक्षा गुंतवणुकीसाठी घेतल्या जाणाऱ्या सोन्याचे प्रमाण अधिक होते. आंतरराष्ट्रीय बँकांनी मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करत ठेवले असून, त्यामुळे जागतिक बाजारात सोन्याला मजबूत पाठबळ मिळत आहे. लग्नाचा हंगाम सुरू होताच दागिन्यांच्या मागणीतही पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. दिवाळीदरम्यान विक्रीत चांगली वाढ दिसली होती. मात्र, त्यानंतरचा 10–15 दिवसांचा कालावधी मंदावलेला होता. आता ग्राहकांकडून पुन्हा चौकशी वाढत असल्याचे ज्वेलर्स सांगत आहेत.

सोन्याच्या जुन्या दागिन्यांचे एक्स्चेंज रेट आणि नवीन दागिन्यांची मागणीही काही प्रमाणात बाजाराला गती देत आहे. दिवाळीदरम्यान जवळपास 40–50 टक्के ग्राहकांनी जुने सोनं बदलून नवे दागिने घेतले. सध्या हा आकडा तुलनेत कमी म्हणजे 20–25 टक्क्यांच्या दरम्यान असला तरी, लग्नसराईत हा दर पुन्हा वाढू शकतो. ग्राहक आता जड डिझाइनपेक्षा हलके, मॉडर्न आणि नव्या ट्रेंडनुसार तयार झालेल्या दागिन्यांकडे अधिक आकर्षित होत आहेत.

नवीन वर्षात सोन्याचा दर काय असू शकतो, याबाबत तयार केलेल्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन महिन्यांत सोन्याच्या किमतीत तब्बल 10 ते 20 टक्क्यांची वाढ होऊ शकते. याचा अर्थ किंमतीत 12 हजार ते 24 हजार रुपयांची वाढ होण्याची शक्यता निर्माण होते. गुंतवणूकदारांसाठी हा काळ महत्त्वाचा ठरू शकतो, कारण सध्याच्या तुलनेत सोनं आणखी महाग होण्याची शक्यता अधिक मानली जाते.

हिऱ्यांच्या दागिन्यांची मागणीही स्थिर असल्याचे तज्ज्ञ नमूद करतात. मोठ्या आकाराच्या सॉलिटेअरपेक्षा मध्यम आणि लहान आकाराच्या हिऱ्यांना ग्राहक पसंती देत आहेत. यामुळे हिऱ्यांच्या बाजारातही चांगली हालचाल सुरू आहे.

सध्याच्या जागतिक आणि देशांतर्गत संकेतांनुसार सोने दर पुन्हा चढण्याची शक्यता मजबूत आहे. गुंतवणूकदारांनी बाजारातील हालचालींवर लक्ष ठेवत योग्य वेळ निवडण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. येणारे महिने गुंतवणुकीच्या दृष्टीने निर्णायक ठरतील, याबाबत सर्वांची एकमत आहे.


सम्बन्धित सामग्री