Monday, February 09, 2026 02:01:30 PM

Online Banking Scam: तुम्हीही 'हा' ॲप वापरताय का? एक चूक आणि काही मिनिटांत खाते रिकामं; HDFC बँकेचा लाखो ग्राहकांना सायबर इशारा

HDFC बँकेने ग्राहकांना वाढत्या APK सायबर फसवणुकीबाबत रेड अलर्ट दिला आहे.

online banking scam तुम्हीही हा ॲप वापरताय का एक चूक आणि काही मिनिटांत खाते रिकामं hdfc बँकेचा लाखो ग्राहकांना सायबर इशारा

Online Banking Scam: डिजिटल व्यवहारांचा वापर वाढत असताना सायबर फसवणुकीचे प्रकारही वेगाने वाढत आहेत. अशाच एका धोकादायक फसवणुकीबाबत देशातील आघाडीच्या खाजगी बँकांपैकी एक असलेल्या HDFC बँकेने आपल्या ग्राहकांना थेट इशारा दिला आहे. ऑनलाइन नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग वापरणाऱ्यांनी जर थोडीशीही निष्काळजीपणा केला, तर काही मिनिटांतच संपूर्ण खाते रिकामं होऊ शकतं, असा गंभीर इशारा बँकेकडून देण्यात आला आहे.

HDFC बँकेनुसार, सध्या ‘APK फसवणूक’ हा प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. APK म्हणजे अँड्रॉइड पॅकेज किट. साधारणपणे मोबाईल वापरकर्ते अॅप्स गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करतात. मात्र सायबर गुन्हेगार बनावट APK फाइल्स तयार करून त्या थेट SMS, व्हॉट्सअॅप किंवा ईमेलद्वारे पाठवत आहेत. या फाइल्स बाहेरून अगदी खरी बँकिंग अॅप्स, ई-चलान, वीज बिल किंवा सरकारी नोटीससारख्या दिसतात, त्यामुळे अनेक जण फसतात.

या फसवणुकीची पद्धत अतिशय धोकादायक आहे. ग्राहकांना ‘तुमचं वीज बिल थकीत आहे’, ‘तुमच्यावर ट्रॅफिक चलान झालं आहे’ किंवा ‘तुमचं बँक खाते ब्लॉक होणार आहे’ अशा स्वरूपाचे मेसेज पाठवले जातात. या मेसेजमध्ये एक लिंक दिलेली असते. लिंकवर क्लिक केल्यानंतर APK फाइल डाउनलोड करण्यास सांगितलं जातं. एकदा ही फाइल मोबाईलमध्ये इन्स्टॉल झाली की, ती अॅप पूर्णपणे फोनवर नियंत्रण मिळवते.

ही बनावट अॅप्स वापरकर्त्यांकडून SMS, कॉल लॉग, कॉन्टॅक्ट्स आणि ओटीपी वाचण्याची परवानगी मागतात. अनेक वेळा वापरकर्ते विचार न करता परवानगी देतात आणि इथेच मोठी चूक होते. परवानगी मिळताच हॅकर्सना तुमचा ओटीपी, बँकिंग माहिती आणि व्यवहारांवर थेट प्रवेश मिळतो. यानंतर काही क्षणांतच खात्यातील रक्कम वेगवेगळ्या खात्यांमध्ये ट्रान्सफर केली जाते.

HDFC बँकेने स्पष्ट केलं आहे की बँक कधीही SMS, व्हॉट्सअॅप किंवा ईमेलद्वारे APK फाइल्स पाठवत नाही. तसेच बँकेचे अधिकृत अॅप्स फक्त गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपल अॅप स्टोअरवरच उपलब्ध असतात. त्यामुळे कोणत्याही अनोळखी लिंकवरून अॅप डाउनलोड करणं धोकादायक ठरू शकतं.

ग्राहकांच्या सुरक्षेसाठी बँकेने काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. अज्ञात नंबर किंवा ईमेलवरून आलेल्या लिंक्सवर क्लिक करू नका. कोणतंही अॅप इन्स्टॉल करताना त्याला कोणत्या परवानग्या हव्या आहेत, हे नीट तपासा. साध्या अॅपला SMS किंवा कॉन्टॅक्ट्सची गरज नसते. अशी मागणी झाल्यास सतर्क व्हा. संशयास्पद अॅप त्वरित डिलीट करा आणि बँकेशी संपर्क साधा.

डिजिटल व्यवहार सोयीचे असले तरी थोडीशी निष्काळजीपणा मोठ्या आर्थिक नुकसानीचं कारण ठरू शकतो. त्यामुळे HDFC बँकेचा हा इशारा गांभीर्याने घेणं आणि सायबर सुरक्षिततेबाबत सजग राहणं अत्यंत आवश्यक आहे.


सम्बन्धित सामग्री