Income Tax: देशभरातील करदात्यांसाठी दिलासादायक आणि तितकाच महत्त्वाचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. आयकर कायद्यातील बदलांनंतर आता आयकर विभागाने नव्या आयकर नियमांचा मसुदा जाहीर केला असून, हे नियम 1 एप्रिल 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे. या बदलांचा थेट परिणाम करदात्यांच्या आयकर रिटर्न भरण्याच्या प्रक्रियेवर होणार आहे.
नवीन आयकर नियमांचा मुख्य उद्देश कर प्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि करदात्यांसाठी सुलभ करणे हा आहे. सध्या लागू असलेले 1961 चे आयकर नियम गुंतागुंतीचे असल्याची तक्रार अनेक वर्षांपासून केली जात होती. विशेषतः मध्यमवर्गीय करदाते, छोटे व्यावसायिक आणि नोकरी करणाऱ्या वर्गाला रिटर्न भरण्याच्या वेळी अडचणींचा सामना करावा लागत होता. हीच अडचण कमी करण्यासाठी सरकारने नियम आणि फॉर्ममध्ये मोठ्या प्रमाणात बदल सुचवले आहेत.
नवीन मसुद्यानुसार आयकर रिटर्न भरण्याचे फॉर्म अधिक ‘स्मार्ट’ करण्यात येणार आहेत. अनेक तपशील आधीच भरलेले असतील, त्यामुळे करदात्यांना वारंवार तीच माहिती टाकण्याची गरज भासणार नाही. यामुळे वेळ वाचेल आणि चुका होण्याचे प्रमाणही कमी होईल. तसेच जुन्या आणि नव्या नियमांची तुलना करण्यासाठी मॅपिंग सिस्टीमही देण्यात आली आहे, ज्यामुळे करदात्यांना बदल सहज समजतील.
या मसुद्यात भांडवली मालमत्तेच्या धारण कालावधीबाबत स्पष्टता देण्यात आली आहे. काही प्रकरणांमध्ये मालमत्ता किती कालावधीसाठी ठेवली गेली आहे, यावर कर आकारणी ठरते. यासोबतच शून्य कूपन बाँड्सशी संबंधित नियम, तसेच पायाभूत सुविधा क्षेत्रातील कंपन्यांसाठी अर्ज प्रक्रियेतील बदल यांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आणि उद्योग क्षेत्रासाठीही हे नियम महत्त्वाचे ठरणार आहेत.
आयकर विभागाने हा मसुदा सार्वजनिक चर्चेसाठी खुला केला आहे. करदाते, चार्टर्ड अकाउंटंट, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या सूचना आणि अभिप्राय देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे मसुदा नियम 22 फेब्रुवारी 2026 पर्यंत सार्वजनिक डोमेनमध्ये उपलब्ध असतील. नागरिक अधिकृत आयकर पोर्टलवर जाऊन आपले मत नोंदवू शकतात.
तज्ज्ञांच्या मते, नागरिकांचा अभिप्राय मिळाल्यास अंतिम नियम अधिक व्यवहार्य आणि करदात्यांच्या गरजेनुसार तयार करता येतील. नवीन आयकर कायदा लागू झाल्यानंतर कर भरणे, रिटर्न दाखल करणे आणि नियम समजून घेणे अधिक सोपे व्हावे, हा सरकारचा प्रयत्न आहे.
एकूणच, कर प्रणाली अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. त्यामुळे करदात्यांनी या संधीचा फायदा घेत आपला अभिप्राय नोंदवावा, असं आवाहनही करण्यात येत आहे.