Friday, February 13, 2026 06:07:57 PM

Beggar Wealth: भीक मागून लाखोंची कमाई? एका भिकाऱ्याकडे तीन घरे, रिक्षा आणि आलिशान कार; सत्य समजताच पोलीसही चक्रावले

इंदौरमधील सराफा भागात भीक मागणारा मंगीलाल प्रत्यक्षात तीन घरे, तीन रिक्षा आणि आलिशान कारचा मालक असल्याचं उघड झालं आहे.

 beggar wealth भीक मागून लाखोंची कमाई एका भिकाऱ्याकडे तीन घरे रिक्षा आणि आलिशान कार सत्य समजताच पोलीसही चक्रावले

मध्य प्रदेशातील इंदौर शहरातून समोर आलेली एक घटना सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरत आहे. रस्त्यावर भीक मागणारा, अंगावर साधे कपडे, हातात जुनी पिशवी आणि चेहऱ्यावर दीनवाणा भाव असलेला व्यक्ती प्रत्यक्षात कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक असू शकतो, यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही. मात्र इंदौरमधील एका भिकाऱ्याची कथा हेच धक्कादायक वास्तव समोर आणते.

इंदौरच्या सराफा भागात अनेक वर्षांपासून एक भिकारी नियमितपणे दिसत होता. तो कुणाकडे थेट पैसे मागत नसे. रस्त्याच्या कडेला शांत उभा राहायचा. त्याची अवस्था पाहून लोक स्वतःहून त्याला पैसे देत असत. कुणाला वाटत नव्हतं की हा माणूस इतकी मोठी कमाई करत असेल. पण प्रशासनाच्या तपासात जे उघड झालं, त्याने अधिकारीही थक्क झाले.

या भिकाऱ्याचं नाव मंगीलाल असल्याचं समोर आलं आहे. तपासादरम्यान कळलं की मंगीलाल रोज भीक मागून ५०० ते १ हजार रुपयांपर्यंत कमाई करत असे. ही रक्कम तो फक्त खर्चासाठी वापरत नव्हता, तर हुशारीने गुंतवणूक करत होता. सराफा परिसरातील काही छोट्या व्यापाऱ्यांना तो व्याजाने पैसे देत असल्याचं चौकशीत उघड झालं. दररोज किंवा आठवड्याच्या हिशोबाने व्याज वसूल करून तो आपली कमाई वाढवत होता.

प्रशासनाला खऱ्या अर्थाने धक्का बसला, तो मंगीलालच्या संपत्तीची यादी समोर आल्यानंतर. इंदौर शहरातील वेगवेगळ्या भागांत त्याची तीन घरे आहेत. याशिवाय त्याच्याकडे तीन ऑटो रिक्षा असून त्या तो भाड्याने चालवतो. एवढंच नाही, तर त्याच्याकडे एक आलिशान कारही आहे, जी चालवण्यासाठी त्याने स्वतंत्र ड्रायव्हर ठेवलेला आहे. बाहेरून अत्यंत गरीब दिसणारा मंगीलाल प्रत्यक्षात आर्थिकदृष्ट्या अत्यंत सक्षम असल्याचं स्पष्ट झालं.

मंगीलाल आपल्या कुटुंबासोबत इंदौरच्या अलवास परिसरात राहतो. त्याचे आई-वडील त्याच्यासोबत असून, त्याचे दोन भाऊ वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक आहेत. विशेष म्हणजे शेजाऱ्यांनाही त्याच्या संपत्तीबाबत फारशी माहिती नव्हती. तो अत्यंत साधं जीवन जगत असल्यामुळे कुणालाच संशय आला नव्हता.

दरम्यान, इंदौरमध्ये भिक्षावृत्तीमुक्त शहर अभियान राबवले जात आहे. या मोहिमेअंतर्गत रस्त्यांवरील भिकाऱ्यांची माहिती घेतली जात असताना मंगीलालची ही बाब समोर आली. प्रशासनाकडून आता त्याच्या उत्पन्नाचे आणि व्यवहारांचे सखोल मूल्यांकन केलं जात आहे.

ही घटना केवळ धक्कादायक नाही, तर समाजाला विचार करायला लावणारी आहे. रस्त्यावर दिसणाऱ्या प्रत्येक गरिबामागे खरी गरिबी असेलच, असं नाही, हे या प्रकरणातून स्पष्ट होतं. तसेच भिक्षावृत्ती आणि त्यामागील वास्तव यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.


सम्बन्धित सामग्री