Health Risk: सोशल मीडियावर दिसणारे वजन कमी करण्याचे व्हिडिओ किती धोकादायक ठरू शकतात, याचं धक्कादायक उदाहरण तामिळनाडूमधून समोर आलं आहे. ‘सेक्सी दिसायचं’ या एकाच इच्छेपोटी एका 19 वर्षीय तरुणीने आपला जीव गमावला. YouTube वर पाहिलेल्या एका चुकीच्या सल्ल्यामुळे तिने रसायनाचं सेवन केलं आणि काही तासांतच तिचा मृत्यू झाला.
आजच्या काळात फिट दिसणं, स्लिम राहणं हे अनेकांसाठी मानसिक दबावाचं कारण ठरत आहे. सोशल मीडियावर परफेक्ट बॉडी दाखवणाऱ्या पोस्ट्स पाहून अनेक तरुण-तरुणी स्वतःच्या शरीराविषयी असमाधानी होतात. डॉक्टरांकडे जाण्याऐवजी, खर्च टाळण्यासाठी किंवा पटकन वजन कमी व्हावं म्हणून अनेकजण YouTube, Instagram यांसारख्या प्लॅटफॉर्मवर दाखवले जाणारे घरगुती उपाय, नुस्खे किंवा तथाकथित ‘शॉर्टकट’ वापरतात. मात्र हेच शॉर्टकट कधी कधी जीवघेणे ठरतात.
मदुराई शहरातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील 19 वर्षीय तरुणीला वाढत्या वजनाची चिंता सतावत होती. वजन कमी करण्यासाठी तिने YouTube वर व्हिडिओ शोधायला सुरुवात केली. एका व्हिडिओमध्ये वजन झपाट्याने कमी करण्यासाठी ‘बोरेक्स’ नावाचं केमिकल घेण्याचा दावा करण्यात आला होता. हा सल्ला विश्वासात घेऊन तिने ते रसायन विकत घेतलं आणि सकाळच्या वेळी सेवन केलं.
केमिकल घेतल्यानंतर काही वेळातच तिची प्रकृती बिघडू लागली. तीव्र उलट्या, जुलाब, चक्कर येणं आणि अशक्तपणा अशी लक्षणं दिसू लागली. नातेवाईकांनी तिला तत्काळ खासगी रुग्णालयात नेलं. प्राथमिक उपचारानंतर तिला घरी सोडण्यात आलं, मात्र काही तासांतच तिची अवस्था अधिक गंभीर झाली. रात्री उशिरा तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तरुणीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी ‘संशयास्पद मृत्यू’ म्हणून नोंद घेतली आहे.
तज्ज्ञांच्या मते, बोरेक्स किंवा सोडियम टेट्राबोरेट हे मानवी सेवनासाठी अजिबात सुरक्षित नाही. हे रसायन साफसफाईसाठी, कीटकनाशकांमध्ये किंवा डिटर्जंटमध्ये वापरलं जातं. शरीरात गेल्यावर हे थेट किडनी, यकृत आणि इतर अंतर्गत अवयवांवर परिणाम करतं. केमिकल पॉइजनिंगमुळे अवयव निकामी होऊ शकतात आणि मृत्यूही होऊ शकतो.
ही घटना सोशल मीडियावरील अप्रामाणिक माहिती किती धोकादायक ठरू शकते, याचा गंभीर इशारा देणारी आहे. वजन कमी करायचं असल्यास वैद्यकीय सल्ला, योग्य आहार आणि व्यायाम हाच सुरक्षित मार्ग असल्याचं आरोग्य तज्ज्ञ पुन्हा एकदा सांगत आहेत.