Tue. Jun 28th, 2022

मनसे नेत्यांना जेल की बेल ?

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या अटकपूर्व जामीनावर गुरुवारी निर्णय होणार आहे. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या जामीनाला मुंबई पोलिसांनी जोरदार विरोध केला असून हे दोघेही अद्याप फरार आहेत. मुंबई सत्र न्यायालय देशपांडे आणि धुरी यांच्या अटकपूर्व जामिनाच्या याचिकेवर निर्णय देणार आहे. मुंबई पोलिसांकडून मात्र या दोन्ही मनसे नेत्यांच्या अटकपूर्व जामिनाला कडाडून विरोध करण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्जावर १९ मे रोजी निकाल देणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आज संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना दिलासा मिळणार की, त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काय आहे प्रकरण ?

मुंबईतील शिवाजी पार्क येथील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी माध्यमांशी बोलणं झाल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना पोलिसांनी ताब्यात घेत असल्याचं सांगितलं. त्यावेळी संदीप देशपांडे यांनी आम्ही तुमच्यासोबत येत असल्याची कबुलीही पोलिसांना दिली. मात्र, काही वेळानंतर पोलिसांसोबत चालल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे देशपांडे यांच्या खासगी गाडीत बसले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु, गाडी न थांबवताच ते तिथून निघून गेले. तसेच त्यांची गाडी भरधाव वेगानं जात असताना एक महिला पोलीस जखमी झाली.

संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी पोलिसांना चकवा देत पळ काढल्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. परंतु, पोलिसांनी याप्रकरणी संदीप देशपांडेंवर गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबईतील सत्र न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर मुंबई सत्र न्यायालयाने १९ मे रोजी सुनावणी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.