Sun. Oct 17th, 2021

आमच्या देशात जैश ए मोहम्मदचं अस्तित्त्वच नाही, पाकच्या उलट्या बोंबा   

जम्मू-काश्मिरच्या पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यामागे जैश ए मोहम्मद ही दहशतवादी संघटना होती. या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. यानंतर भारताने हवाई हल्ला करून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तरही दिले.

या सगळ्या घडामोडी घडत असतानाच पाकिस्तान लष्कराने जैश ए मोहम्मद ही संघटना आमच्या देशात अस्तित्त्वातच नाही असे म्हटले आहे.

जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर हा पाकिस्तानात आजारी असल्याचे पाकिस्तानच्याच परराष्ट्र मंत्र्यांनी 4 दिवसांपूर्वी मान्य केले.

आता पाकिस्तानी लष्कर मात्र ही दहशतवादी संघटना आमच्या देशात अस्तित्त्वातच नाही असे म्हणत आहे.

जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसुद अजहर जिवंत

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री मेहमुद कुरेशी यांनी 4 दिवसांपूर्वीच एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा उल्लेख करत या संघटनेचा म्होरक्या मसुद अजहर आजारी असल्याचे सांगितले होते.

मसुद अजहर मारला गेल्याचे वृत्त जेव्हा काही प्रसारमाध्यमांमध्ये आले होते तेव्हा पाकिस्तानचे सांस्कृतिक मंत्री फैय्याज उल हसन यांनीही मसुद जिवंत असल्याची माहिती दिली होती.

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर जागतिक स्तरावर दबाव वाढत आहे.

हाफिज सईद या दहशतवाद्याच्या 2 संघटनांवरही पाकिस्तानने बंदी घातली आहे.

पाकिस्तान भारताच्या कुरापती काढण्याचे धोरण थांबवत नसल्यानेच पुलवामा येथील हल्ल्यानंतर हवाई हल्ला करून भारताने चोख प्रत्युत्तर दिलं.

तरीही पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि भ्याड हल्ले सुरुच आहेत.

आता पाकिस्तानला भारताने चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्तानने जैश ए मोहम्मद ही संघटनाच पाकिस्तानात अस्तित्त्वातच नाही असा दावा केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *