गाझामध्ये महिला पत्रकार बातमीचे थेट प्रक्षेपण करत अचानक मिसाईल हल्ला

जेरुसलेम : पॅलेस्टाईनच्या गाझा पट्ट्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. तीन दिवसांपासून इस्राईल याठिकाणी क्षेपणास्त्र हल्ले करत आहे तर बुधवारी गाझामधील एक महिला पत्रकार याबाबतच्या बातमीचे थेट प्रक्षेपण करत असतानां मागील एका इमारतीवर क्षेपणास्त्र येऊन धडकले. या पत्रकारापासून अवघ्या काही मीटर अंतरावर असलेल्या इमारतीवर हल्ला होऊनही, तिने आपले काम सुरूच ठेवले होते. या पत्रकाराचे नाव योऊमना अल सयेद असं आहे. ही पत्रकार अल जझीरा या वृत्तवाहिनीसाठी वृत्तांकन करते. तसेच यादरम्यान तिने सांगितलं, की इस्राईल सध्या थेट मोठ्या इमारतींना लक्ष्य करत आहे. बुधवारी (भारतीय वेळेनुसार) जोहरा टॉवरला लक्ष्य करण्यात आले. यासोबतच आणखी एका इमारतीवर हल्ला करण्यात आला होता, ज्यामध्ये बहुतांश माध्यमांची कार्यालये होती आणि यात अनेक लोकांचे जीव गेले आहेत. योऊमना ज्यावेळी वृत्तांकन करत होती, तेव्हाही मागून क्षेपणास्र स्फोटांचे आवाज सुरूच होते. कित्येक वेळा तिला मध्ये थांबावं लागत होतं, तरीही ती न घाबरता काम करत राहिली. शिवाय स्फोटाच्या आवाजामुळे तिला काही ऐकू येत नव्हतं. त्यानंतर अचानक ती ज्याठिकाणी उभी होती तिथून बाजूला झाली. त्यांच्या कॅमेऱ्याच्या मागे जवळच एका ठिकाणी क्षेपणास्त्र हल्ला झाला होता. काही क्षण स्तब्धतेत गेल्यानंतर ती सांगते, की “आम्ही आता कॅमेरा दुसरीकडे वळवून तुम्हाला स्फोटाची जागा दाखवतो. माझ्या समोरच या इमारतीवर हे क्षेपणास्त्र येऊन आदळले.” यानंतर ते कॅमेरा फिरवून आपल्याला धुराच्या लोटातील ती इमारत दाखवतात. योऊमना म्हणते, की “ही इमारत अजूनही कोसळली नाही. म्हणजेच या इमारतीवर आणखी हल्ले होतील.” गाझामधील वर्दळीचे ठिकाण असलेल्या रोमन परिसरात ही इमारत आहे. इस्राईल आणि हमास संघटनेमध्ये २०१४ नंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंसाचार होतो आहे.

Exit mobile version