जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्याप्रकरणी कंगना राणावत गैरहजर

जावेद अख्तर बदनामी प्रकरणी कंगना चौकशीसाठी गैरहजर असून मुंबईबाहेर असल्याने चौकशीला येऊ शकणार नाही, असं कंगनाने पोलिसांना कळविलं आहे. गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्याप्रकरणी अभिनेत्री कंगना राणावत जुहू पोलिसांच्या चौकशीला शुक्रवारी गैरहजर राहिली. अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येनंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगना राणावतने अख्तर यांच्याबाबत बदनामीकारक टिप्पणी केली होती. त्यानंतर जावेद अख्तर बदनामी प्रकरणावर कंगना विरोधात अंधेरी न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला.
या प्रकरणात न्यायालयाने कंगनाची चौकशी करून अहवाल १ फेब्रुवारीला सादर करण्याचे आदेश जुहू पोलिसांना दिले होते. त्यानुसार या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांनी कंगनाला समन्स बजावले होते. मात्र मुंबईबाहेर असल्याने कंगना चौकशीला उपस्थित राहिली नाही. दरम्यान आता पुढील तारखेला पोलिसांकडून कंगनाची चौकशी केली जाईल, असं जुहू पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.