Sun. May 31st, 2020

महाभियोगाच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाणार – सिब्बल

जय महाराष्ट्र न्युज
 
भारताच्या दीपक मिश्रा सरन्यायाधीशांच्या विरोधातील महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळण्याचा उपराष्ट्रपतींचा निर्णय तर्कसंगत वाटत नाही असे म्हणत काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार कपिल सिब्बल यांनी या निर्णयावर टीकेची झोड उठवली. उपराष्ट्रपतींनी अत्यंत घाईने हा प्रस्ताव फेटाळला आहे,असे करण्यापूर्वी त्यांनी एखाद्या विशेषज्ञाचा सल्ला घ्यायला हवा होता’,अशा शब्दात सिब्बल यांनी पत्रकार परिषदेत या निर्णयावर आक्षेप नोंदवला आहे.
 
इतकेच नाही, तर उपराष्ट्रपतींच्या या निर्णयाविरोधात काँग्रेस पक्ष कोर्टात जाणार असल्याचेही काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार कपिल सिब्बल यांनी जाहीर केले आहे. 

विरोधी पक्षाच्या राज्यसभा खासदारांनी महाभियोगाचा प्रस्ताव दिला होता. शुक्रवारी काँग्रेससह सात विरोधी पक्षाच्या खासदारांनी सरन्यायाधीशांविरोधांत पदाचा दुरुपयोग आणि अन्य आरोपांतर्गत महाभियोग प्रस्ताव दाखल केला होता. या प्रस्तावावर ७१ खासदारांच्या सह्या होत्या. मात्र, त्यातील सात खासदार हे राज्यसभेतून निवृत्त झाले आहेत. या आधारावर उपराष्ट्रपतींनी हा प्रस्ताव फेटाळला असल्याची चर्चा आहे. रविवारी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपला यांच्यासह कायदेतज्ज्ञांसोबत सल्लामसलत केली होती.  त्यानंतर आज सकाळी उपराष्ट्रपतींनी हा निर्णय फेटाळून लावलाय. देशात आजपर्यंत सरन्यायाधीशांविरोधात कधीही महाभियोगाचा प्रस्ताव दाखल झाला नव्हता. त्यामुळे अनेक कायदे तज्ञांचे या प्रस्तावाकडे लक्ष लागले होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *