Mon. Jan 17th, 2022

मी देखील तितकाच दोषी! राहुल-हार्दिकच्या प्रकरणावर अखेर करण बोलला…!

‘Koffee with karan’ या करण जोहरच्या शोमध्ये नुकताच क्रिकेटपटू हार्दिक पांड्या व के. एल. राहुल यांनी हजेरी लावली होती.

हार्दिक आणि के. एल. राहुल या दोघांनी या एपिसोडमध्ये महिलांविषयी काही आक्षेपार्ह विधाने केलीत आणि त्यांच्या या वक्तव्यामुळे दोघांवरही प्रचंड टीका झाली. सोशल मीडियावर हार्दिक व के. एल. राहुल यांच्यावर जोरदार टीकाही झाल्या.

हा वाद इतका पेटला की, हार्दिक पांड्या व के. एल. राहुलवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) निलंबनाची कारवाई केली. त्यांना ऑस्ट्रेलिया दौ-यातून माघारी बोलावले.

आपल्या वक्तव्यांबद्दल हार्दिकने ट्विटर अकाऊंटवरुन जाहीर माफी मागितली.

पण तरीही हा वाद थांबला नाही. आता या संपूर्ण प्रकरणावर ‘कॉफी विथ करण’चा होस्ट करण जोहरची प्रतिक्रिया आली आहे.

मी अनेक रात्री झोपलो नाही- करण जोहर

एका ताज्या मुलाखतीत करण यावर बोलला. या संपूर्ण प्रकरणासाठी हार्दिक व के. एल. राहुल जितके जबाबदार आहेत, तितकाच मी सुद्धा आहे, असे करण म्हणाला आहे.

हा शो माझा आहे आणि मीच हार्दिक व राहुल यांना गेस्ट म्हणून बोलवले होते. मीच प्रश्न विचारले आणि म्हणून हार्दिक व राहुल बोलले.

त्यामुळे त्यांच्या चुकीत मी सुद्धा भागीदार आहे. या वादानंतर मी अनेक रात्री झोपलो नाही. मी हे सगळे कसे ठीक करू? माझे कोण ऐकणार? असे प्रश्न मला सतावत राहिले.

आता हे प्रकरण माझ्या नियंत्रणाबाहेर गेले आहे, असे करण जोहर म्हणाला आहे.

क्रिकेटपटू श्रीशांतचीही टीका

काही दिवसांपूर्वी माजी क्रिकेटपटू श्रीशांतने या संपूर्ण प्रकरणात करणलाच दोषी ठरवले होते.

हार्दिक व राहुल काही चुकीचे बोलत असताना पाहून करणने त्यांना थांबवायला हवे होते.

शोचा होस्ट या नात्याने ही त्याची जबाबदारी होती, असं श्रीशांतने म्हटलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *