Sun. Aug 18th, 2019

करिना कपूर काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवणार ?

107Shares

महिन्याभरापूर्वी मध्य प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपाचा पराभव केला. आता याच यशाची पुनरावृत्ती लोकसभा निवडणुकीत करण्यासाठी काँग्रेसची जोरदार तयारी केली आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधून अभिनेत्री करिना कपूरला लोकसभेची उमेदवारी देण्याचा आग्रह काँग्रेसच्या नगरसेवकांनी धरला आहे. तसेच करिना कपूर तरुणांमध्ये अतिशय लोकप्रिय असल्याने भोपाळ मतदारसंघ जिंकणे सोपे होईल, असे राजकीय गणित काँग्रेस नगरसेवकांनी मांडले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून भोपाळ लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे आहे. भाजपाच्या या बालेकिल्ल्यात काँग्रेसची डाळ शिजत नाही. त्यामुळे भाजपाच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडायचे असल्यास करिना कपूर यांना उमेदवारी द्या, असा आग्रह काँग्रेसच्या नगरसेवकांनी पक्षाकडे धरला आहे. तरुणांमध्ये करिनाची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात आहे. तिचा चाहतावर्ग प्रचंड आहे. याचा फायदा करिना कपूर आणि पर्यायाने काँग्रेसला होईल, असा दावा काँग्रेस नगरसेवक गुड्डू चौहान आणि अनीस खान यांनी वरिष्ठ नेत्यांकडे केल्याचे वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे.

करिना कपूर पतौडी घराण्याची सून असल्याने त्याचा फायदा तिला जुन्या भोपाळमध्ये होईल. याशिवाय महिला वर्गदेखील करिनाला मोठ्या प्रमाणात मतदान करेल, असा विश्वास नगरसेवक अनीस खान यांनी व्यक्त केला आहे. करिनाचा पती सैफ अली खान आणि भोपाळ यांचा घनिष्ठ संबंध आहे. पतौडी कुटुंब अनेक वर्षांपासून भोपाळमध्ये वास्तव्यास आहे. सैफ, करिना, शर्मिला टागोर, सोहा अली खान अनेकदा भोपाळला येतात. भोपाळ आणि पतौडी घराण्यातील याच कनेक्शनचा फायदा करिनाला होईल, असा विश्वास काँग्रेसमधील अनेक नेत्यांना वाटतो, यासाठी काँग्रेसचे नगरसेवक लवकरच मुख्यमंत्री कमलनाथ यांची भेट घेणार आहेत.

107Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *