केतकी चितळे पोलिसांच्या ताब्यात

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे अभिनेत्री केतकी चितळेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ठाणे पोलिसांनी केतकी चितळेला ताब्यात घेतले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
केतकी चितळे हिने फेसबुकच्या माध्यमातून शरद पवार यांचा अपमान करणारी पोस्ट केली आहे. त्यामुळे केतकी चितळेला चांगलंच ट्रोल केलं जात आहे. शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे राष्ट्रवादी नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. केतकी चितळे हिच्याविरोधात ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुणे आणि साताऱ्यातही केतकीविरोधात राष्ट्रवादीतर्फे गुन्हा दाखल झाला आहे. तसेच, केतकी चितळेविरोधात राज्य महिला आयोगाकडेही तक्रार दाखल केली जाण्याची शक्यता आहे.
ऍड. नितीन भावे यांनी लिहिलेली कविता केतकी चितळेने फेसबुकच्या अधिकृत अकाऊंटवर पोस्ट केली आहे. शरद पवारांनी सादर केलेल्या ‘पाथरवट’ या कवितेचा संदर्भ घेत केतकीने पवारांच्या विरोधात कवितेच्या ओळी पोस्ट केल्या आहेत. दरम्यान, ठाणे पोलिसांनी केतकीला ताब्यात घेतले आहे. त्यामुळे केतकीची कसून चौकशी केली जाणार असून केतकीला अटक होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.