बुधवारी केतकी चितळेची पोलीस कोठडी संपणार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ झाली आहे. केतकी चितळेला ठाणे सत्र न्यायालयाने १८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान, केतकी चितळेची पोलीस कोठडी बुधवारी संपणार आहे.
अटकेत असलेल्या केतकी चितळेची ठाणे गुन्हे शाखेकडून आठ तास कसून चौकशी करण्यात आली आहे. चौकशी दरम्यान केतकीचा लॅपटॉप आणि मोबाईल जप्त करण्यात करण्यात आला असून अद्याप ठाणे सायबर सेलकडून यामधील तांत्रिक बाबी येणे बाकी आहे. दरम्यान, बुधवारी केतकी चितळेची पोलीस कोठडी संपणार असून बुधवारी केतकीला ठाणे नगर पोलीस कोठडीतून न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
केतकी चितळे हिने फेसबुकच्या माध्यमातून शरद पवार यांचा अपमान करणारी पोस्ट केली आहे. त्यामुळे केतकी चितळेला चांगलंच ट्रोल केलं जात आहे. शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे राष्ट्रवादी नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. तसेच केतकीला पोलीस ताब्यात घेत असताना तेथे जमलेल्या कार्यकर्त्यांकडून केतकीवर शाईफेक करण्यात आली.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे केतकीविरोधात ठाणे, पुणे, जळगाव, सिंधुदुर्गसहित राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे केतकीचा कोठडीतील मुक्काम वाढण्याची शक्यता आहे.