Thu. May 6th, 2021

केतकी माटेगावकर आणि ऋषिकेश म्हणताहेत ‘पाहिले मी तुला’

पहिल्या प्रेमाच्या आठवणींचा एक हळवा कप्पा प्रत्येकजण आपल्या मनात जपत असतो. मनाच्या कप्प्यातील या गोड आठवणी प्रत्येक वळणावर आपल्याला सदैव साद घालीत असतात. कधीतरी या गोड आठवणीने मन हळवं होतं आणि त्या पहिल्या नजरेचा, पहिल्या स्पर्शाचा भास होतो. असंच काहीसं झालंय गायिका केतकी माटेगावकर आणि गायक ऋषिकेश रानडे यांच्या बाबतीतही पण… ‘पाहिले मी तुला’ या मराठी प्रेमपटाच्या गीतध्वनीमुद्रण प्रसंगी. ‘पाहिले मी तुला’ या आगामी मराठी चित्रपटासाठी हे दोन्ही युवा गायक-गायिका एकत्र आले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन मनोज कोटियन करीत आहेत. सुशील पाटील आणि निलेश लोणकर यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

गीतकार गुरु ठाकूर यांच्या लेखणीतून उतरलेल्या ‘केलीस तू नेमकी काय जादू… तुझ्या रंगी मी रंगले’ या अलवार प्रेमगीताला विजय नारायण गवंडे यांनी संगीतबद्ध केलं आहे. केतकी व ऋषिकेश यांच्या मधूर आवाजाचा स्वरसाज या गीताला लाभला असून नुकतेच याचे गीतध्वनीमुद्रण संपन्न झाले आहे. ‘या गीताची शब्दरचना अप्रतिम असून हे मन:स्पर्शी गीत प्रत्येकाच्या मनाचा नक्की ठाव घेईल’ असा विश्वास या दोन्ही गायकांनी व्यक्त केला.

‘एन एस के श्री फिल्मस इंटरनॅशनल प्रा.लि.’ची प्रस्तुती असलेल्या ‘पाहिले मी तुला’ चित्रपटाची कथा सारंग पवार यांची असून पटकथा आणि संवाद अभय अरुण इनामदार यांनी लिहिले आहेत. छायांकन संजय मिश्रा यांचे आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *