Mon. Aug 15th, 2022

किरीट सोमय्या चौकशीसाठी गैरहजर

आयएनएस विक्रांत युद्धनौकासाठी जमवलेल्या निधीप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधात मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चौकशीसाठी किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांना पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे समन्स बजावले होते. मात्र, सोमय्या पिता-पुत्रा चौकशीसाठी हजर राहणार नाहीत, अशी माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे.

किरीट सोमय्या यांचे वकील पोलीस स्थानकात दाखल झाले असून किरीट सोमय्या पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी नवी दिल्लीत असल्यामुळे सोमय्या चौकशीसाठी येणार नाहीत. तसेच नील सोमय्या यांचेही कार्यक्रम ठरले असल्यामुळे तेसुद्धा चौकशीसाठी येणार नाहीत. तर, येत्या १३ एप्रिलनंतर सोमय्या पिता-पुत्र चौकशीसाठी हजर राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

आयएनएस विक्रांत युद्धनौका घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासाठी किरीट सोमय्यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, या अर्जावर ११ एप्रिल रोजी मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.

काय आहे प्रकरण?

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेता किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. विक्रांत युद्धनौकेच्या नावावर ५८ कोटी रुपयांची रक्कम लाटली असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. संजय राऊतांनी आरोप केला की, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी २०१४ साली विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी पैसे गोळा करण्याची मोहीम सुरू केली होती. या मोहिमेत ५७ ते ५८ कोटी रुपयांची रक्कम झाली होती. पण ही रक्कम राज्यपाल कार्यालयात पोहचले नसल्याचे समोर आले आहे. सोमय्यांनी विक्रांत युद्धनौकेच्या नावावर लाटलेली रक्कम २०१४च्या निवडणूकीसाठी आणि त्यांच्या निकॉन इन्फ्रा कंपनीत वळवला आहे. हा घोटाळा म्हणजे किरीट सोमय्यांनी देशाच्या संरक्षण व्यवस्थेशी, राष्ट्रीय भावनेशी केलेली प्रतरणा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.