Wed. Jul 28th, 2021

शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेली रक्कम परत करण्याचे आदेश!

मोठा गाजावाजा करत काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचं उद्घाटन करण्यात आलं. मात्र या योजनेचा नांदेडसह राज्यात बोजवारा उडाल्याचं पाहायला मिळालंय. हजारो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेले दोन हजार रुपये काही तासांतच परत करण्याचे आदेश अनेक बँकाना आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

रविवार असूनही केंद्र सरकारच्या निर्देशाने सर्वच बँकाचे कामकाज सुरु होतं.

केंद्र शासनाच्या शेतकरी सन्मान योजनेतील 6 हजार रूपयांपैकी दोन हजारांचा पहिला हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार होता.

त्यानुसार नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जिल्ह्यातील 8 हजार 182 शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी दोन हजार रुपये जमा झाले.

मात्र अवघ्या काही तासातच 1 हजार 21 लाभार्थी शेतकऱ्यांना हे पैसे परत करण्याचे निर्देश बँकांना देण्यात आले.

या संदर्भात जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक अजय कदम यांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय.

यासंदर्भातील पत्र, नांदेडच नव्हे तर परभणी,कोल्हापूर, लातूर अशा राज्यातील अनेक बँकाना आल्याचं सांगितलं.

राज्यातील हजारो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेली रक्कम (71)अनुसार अकाऊंट त्रुटी दाखवून परत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

शासनाचा हा निर्णय अजब आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होतोय.

हे तर ताटात वाढलेलं काढून घेण्याचा हा प्रकार असल्याची टीका संतप्त शेतकरी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *