Thu. May 6th, 2021

‘कुंभमेळ्यातून येणाऱ्यांना सक्तीने विलगीकरणात ठेवणार’

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १४ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजल्यापासून राज्यात टाळेबंदी लागू करण्यात आली. मात्र, ही टाळेबंदी पूर्ण स्वरूपात लागू न करता जीवनावश्यक सेवांसोबतच काही इतर सेवा आणि उद्योगांना देखील यातून सूट देण्यात आली आहे. त्यासोबतच, सामान्य नागरिकांना देखील काही सबळ कारणांसाठी घराबाहेर पडण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपली भूमिका मांडली आहे. ‘कोविड-१९ ची सध्याची परिस्थिती पाहता संपूर्ण टाळेबंदी लागू करायला हवी’, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.

मुंबईतल्या ५ टक्के बेजबाबदार नागरिकांमुळे उरलेल्या ९५ टक्के नागरिकांना अडचण होत असल्याचं महापौर म्हणाल्या. ‘९५ टक्के मुंबईकर कोविड-१९ च्या नियमांचं पालन करतात. पण ५ टक्के लोकं निर्बंधांचं पालन करत नाहीत. त्यामुळे त्यांच्यामुळे इतरांना अडचण होते. यासाठीच मला वाटतं सध्याची परिस्थिती पाहाता संपूर्ण लॉकडाऊन लागू करायला हवा’, असं महापौर म्हणाल्या.

तसेच कुंभमेळ्याहून परत येणाऱ्या नागरिकांना विलगीकरणात ठेवण्याचा विचार करत असल्याचं देखील महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलं. ‘कुंभमेळ्याहून आपापल्या राज्यात जाणारी लोकं सोबत ‘प्रसाद’ म्हणून कोरोना आणत आहेत. या सर्व लोकांना त्यांच्या त्यांच्या राज्यांमध्ये क्वारंटाईन करायला हवं. त्याचा खर्च त्या लोकांकडूनच घ्यायला हवा. मुंबईत देखील आम्ही कुंभमेळ्याहून परतणाऱ्या नागरिकांना परतल्यानंतर विलगीकरणात ठेवण्याचा विचार करत आहोत’, असं पेडणेकर यांनी स्पष्ट केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *