Sat. Oct 1st, 2022

कुलदीप यादवची हॅट्रिक कामगिरी, ‘ही’ कामगिरी करणारा पहिला भारतीय

विशाखापट्टणम : टीम इंडियाचा चायनामन बॉलर कुलदीप यादवने विंडिज विरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये धमाल कामगिरी केली. कुलदीपने विंडिज विरुद्ध हॅट्रिक hat-trick घेण्याची कामगिरी केली. मॅचच्या 33 व्या ओव्हरच्या शेवटच्या 3 बॉलमध्ये त्याने ही हॅट्रिक घेतली.

कुलदीपने विंडिजच्या शाय होप, जेसन होल्डर आणि अल्झारी जोसेफला बाद करत हॅट्रिक घेतली. कुलदीपची या हॅट्रिकसह वनडे कारकिर्दीतील दुसरी हॅट्रिक ठरली. टीम इंडियाकडून दुसऱ्यांदा हॅट्रिक घेणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे.

कुलदीपने आपल्या वनडे कारकिर्दीतील पहिली हॅट्रिक ऑस्ट्रेलियाविरुद्ध घेतली होती. ऑस्ट्रेलिया विरुद्ध २१ सप्टेंबरला २०१७ ला सामन्यात कुलदीपने ही कामगिरी केली होती. कुलदीपने तेव्हा मॅथ्यू वेड, एश्टन एगर आणि पॅट कमिन्सला बाद करत हॅट्रिक घेतलेली.

कुलदीपने २०१४ साली अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये स्कॉटलंड विरुद्ध देखील हॅट्रिक कामगिरी केले होती. कुलदीपने स्कॉटलंडच्या निक फररार, काइल स्टार्लिंग आणि एलेक्स बाम या तिघांना बाद केले होते.

वनडेत हॅट्रिक घेतलेले भारतीय बॉलर्स

कुलदीप व्यतिरिक्त टीम इंडियाच्या 3 बॉलर्सने हॅट्रिक घेण्याची कामगिरी केली आहे. टीम इंडियाकडून पहिली हॅट्रिक घेण्याची कामगिरी 1987 साली चेतन शर्मा यांनी केली होती. ही हॅट्रिक कामगिरी न्यूझीलंड विरुद्ध नागपूर येथे केली होती.

कपिल देव यांनी श्रीलंकेविरुद्ध कोलकाता येथे 1991 साली हॅट्रिक घेतली होती. यानंतर मोहम्मद शमीने यावर्षी जून महिन्यात अफगाणिस्तान विरुद्ध हॅट्रिक घेतली होती.

वनडे क्रिकेट विश्वात दुसऱ्यांदा हॅट्रिक घेणारा कुलदीप हा पाचवा बॉलर ठरला आहे. याआधी दोन हॅट्रिक घेण्याची कामगिरी वसीम अक्रम, शकलेन मुश्ताक, चामिंडा वास आणि ट्रेन्ट बोल्ट या बॉलर्सनी केली आहे.

तर श्रीलंकेच्या यॉर्कर स्पेशालिस्ट मलिंगाने वनडेत सर्वाधिक म्हणजे 3 वेळा हॅट्रिक घेण्याची कामगिरी केली आहे. अशी कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू आहे.

आयसीसीने आपल्या ट्विटर अकाउंटवर कुलदीपचा फोटो कव्हर फोटो म्हणून ठेवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.