मेल्यानंतरही अवहेलना, स्मशानभूमीत सुविधांचा बोजवारा

स्मशानभूमीत मृतांच्या नातेवाईकांना गैरसोयीचा सामना करावा लागतोय.

अनेकजण निसरड्या लाद्यांमुळे घसरून पडत आहेत. मृतांच्या नातेवाईकांना उभे राहणे देखील कठीण होत आहे.

पावसाळ्यात याठिकाणी हाल होतात. तरी देखील महापालिकेने लक्ष देऊन उपाययोजना केल्या असल्याचे दिसून येत नाही.

देखभालीसाठी खर्च करण्याची तरतूद असतांना देखील गैरसोयच नशिबी आहे.

अखेरचा निरोप देतांना देखील सुविधांचा बोजवारा पाहता स्मशानयातना संपणार कधी असा सवाल नागरिकांतून समोर येत आहे.

पालिका हद्दीतील अनेक स्मशानभूमीत दिवे, लाकडे तसेच अन्य सुविधांची वाणवा आहे. कुठे विद्यूतशेगडया नादुरुस्त आहेत. तर काही ठिकाणी पाण्याची, कर्मचाऱ्यांची कमतरता देखील आहे.

त्यामुळे अनेकदा नागरिकांना बराच वेळ थांबावे लागते. प्रेत दहन केल्यावर राख, अस्थी बाजूला काढण्यासाठी घमेले, फावडे, टिकाव आदी साहित्य वापरले जाते.

मात्र बऱ्याच स्म्शानभूमीत याचा तुटवडा आहे. ज्याठिकाणी साहित्य आहे ते नादुरुस्त असल्याचे समजते.

अनेक सुविधांचा अभाव असल्याने याचा फटका, मृतांच्या नातेवाईकांना बसत आहे.

वसई विरार महापालिकेची लोकसंख्या 20 लाखाहून अधिक आहे.

नालासोपारा, विरार, वसई आणि नायगाव हद्दीत एकूण 85 स्मशानभूमी आहेत. या स्मशानभूमीची देखभाल करता यावी यासाठी 2 कोटी इतकी तरतूद केली आहे.

प्रभाग समिती सी वनोठापाडा गावात असलेल्या स्म्शानभूमीची दुरावस्था आहे.

याठिकाणी बांधण्यात आलेली संरक्षक भिंत कोसळली आहे. त्यामुळे पावसाचे आणि बाजूला असणाऱ्या नाल्याचे पाणी शिरत आहे.

तसेच याठिकाणी लावण्यात आलेल्या लाद्या निघाल्या आहेत. लाद्या निसरड्या झाल्या आहेत.

याबाबत वसई विरार महापालिकेने उपाययोजना कराव्यात अशी मागणी प्रभाग समिती सहाय्यक आयुक्तांकडे केली आहे.

Exit mobile version