कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी सरपंच मॅडमनी ठेवलं आपलं मंगळसूत्र गहाण!

जेवायला बसण्याआधी आपला कर्मचारी जेवला का, याची काळजी अन्‌ विचारणा करणारे मालक इतिहासजमा झालेत अस म्हटलं तरी वावग ठरणार नाही. मात्र, जिव्हाळ्याची ही भावना, चांगुलपणा संपलेला नाही याची जाणीव करुन देणारी घटना नाशिक मधे घडली. नाशिक जिल्ह्यातील एकलहरे ग्रामपंचायतीकडे पैसे नसल्याने दिवाळीत कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले. या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी, त्यांच्या दारात पणती पेटावी म्हणून सरपंच मोहिनी जाधव यांनी चक्क आपले मंगळसूत्र गहाण ठेवले.

का आली ही वेळ?

नाशिकमधील एकलहरे ग्रामपंचायतीस महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कारखान्याची घरपट्टी दरवर्षी एप्रिलच्या अखेरपर्यंत जमा होतो.

महाराष्ट्र शासनाने कलम 125 रद्द करून कलम 124 नुसार रेडिरेकनरच्या दराने घरपट्टी वसूल करण्याचे आदेश दिल्यानंतर त्यानुसार आर्थिकदृष्ट्या वीजनिर्मिती कंपनीला घरपट्टीची आकारणी करून बिल बजावण्यात आलं.

वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा घरपट्टीतून सूट मिळावी, हे कारण पुढे करून वीजनिर्मिती प्रशासनाकडून टाळाटाळ केली गेली.

त्यामुळे ग्रामपंचायतीच्या तिजोरीत खडखडाट झाला.

दरम्यान उत्पन्नाचे अतिरिक्त साधन नसल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन थकले. कारभार चालवणेसुद्धा अवघड झाले.

दिवाळीसारखा सण असल्याने ज्या कर्मचाऱ्यांच्या भरवशावर ग्रामपंचायतीचा कारभार चालतो, त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची दिवाळी चांगली व्हावी, या उद्देशाने सरपंच मोहिनी जाधव यांनी मंगळसूत्रासह दागिने बॅंकेत गहाण ठेवत 75 हजार रुपये कर्ज घेतले. त्यातून कर्मचाऱ्यांचे वेतन करून त्यांची दिवाळी गोड केली.

ऐन दिवाळीच्या तोंडावर पगार थकल्याने ग्रामपंचायतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलं होतं.  घरीत दिवाळी साजरी कशी करायची या चिंतेत सगळा कर्मचारीवर्ग होते. कर्मचाऱ्यांची ही अडचण समजून घेत त्यांचा घरी दिवाळी गोड व्हावी म्हणून चक्क सरपंच मोहिनी जाधव यांनी सौभाग्याचं प्रतीक असलेलं आपल्या गळ्यातील मंगळसूत्र चक्क गहाण ठेवलं आणि या कर्मचाऱ्यांचा पगार देऊन त्यांची दिवाळी गोड केली. त्यांनी दिलेल्या मदतीच्या या हातामुळे कर्मचारीही भारावून गेले.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण जेवणाच्या ताटावर बसताना कर्मचारी, गेटवरचा रखवालदार जेवला ना, याची विचारणा करीत. त्याची खात्री झाल्यावरच स्वतः जेवण करत असत, असं उदाहरण आता दुर्मीळ झालं आहे. जाधव यांचे पद लहान. त्या सामान्य गृहिणी. मात्र, त्यांनीही असाच काहीसा आदर्श मनाशी बाळगला असावा. कुटुंबासाठी किंवा शौचालयासाठी महिलेने दागिने गहाण किंवा विकल्याचे आपण वाचले किंवा दूरचित्रवाणीच्या अनेक वाहिन्यांवर बघितले असेल. मात्र कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी आपलं सौभाग्यलेणं गहाण ठेवण्याचं हे उदाहरण मात्र आगळेच म्हणावं लागेल.

Exit mobile version