छत्रपती संभाजीनगर : पंढरपुरला दरवर्षी लाखो भाविक वारीला जातात. मोठ्या भक्तीभावाने भाविक विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी उत्सुक असतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीत दाखल होतात. देहूतून श्री संत तुकाराम महाराज आणि आळंदीहून श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान होते. त्या पालखीसोबत वारकरी पायी पंढरपुरची वाट धरतात. विठुमाऊलीच्या जयघोषात वारकरी पालखीसोबत पंढरपुरला जातात. या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व जिल्हास्तरीय प्रशासनाकडून चोख व्यवस्था केली जाते. यंदा ठिकठिकाणच्या वाहतुकीतही बदल करण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून आषाढी एकादशीनिमित्त एसटी महामंडळातर्फे भाविकांच्या सुविधेसाठी १६ जुलै रोजी ११० जादा बस सोडण्यात येणार आहेत. १३ जुलैपासून भाविकांच्या गर्दीनुसार बस सोडण्यात येतील. कमी गर्दीच्या मार्गावरील एसटी फेऱ्या रद्द करून ती बस पंढरपूरसाठी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी पंडित चव्हाण यांनी दिली.