मनोज तेली मुंबई : भाजपा पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यावर देवेंद्र फडणवीस हे आता महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री असतील यावर अधिकृतरीत्या शिक्कामोर्तब झाले आहे. एक दशकाच्या प्रवासानंतर, जे काही राजकीय उलथापालथ महाराष्ट्राने पाहिले, त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.
देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी संध्याकाळी 5.30 वाजता मुंबईतील आझाद मैदान येथे होणाऱ्या सोहळ्यात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. या सोहळ्याचा एक भाग म्हणून महाराष्ट्रात मागच्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या राजकीय शह काटशहाच्या खेळाचं आणि सत्तासंघर्षाचं एक वर्तुळ पूर्ण होईल.
2014 ते 2019: मुख्यमंत्रिपदाची सलग पाच वर्षं
2014 मध्ये भाजपाच्या नेतृत्वात महायुती सरकार स्थापन झालं आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. 2014 ते 2019 अशी सलग पाच वर्षे त्यांनी राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात अनेक विकासकामे सुरू झाली आणि राजकारणात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी 'मी पुन्हा येईन' अशी घोषणा केली आणि भाजपच्या नेतृत्त्वात महायुतीने 162 जागांसह स्पष्ट बहुमत मिळवला.
2019 चा 'घात' आणि सत्तासंघर्षाची सुरूवात
तथापि, यानंतर राजकारणात नवे वळण आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या समसमान वाटपाचा मुद्दा पुढे करत अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाची मागणी केली. महायुतीतील स्पष्ट बहुमत असूनही, महाराष्ट्रातील राजकीय समिकरणं बदलू लागली. देवेंद्र फडणवीस यांच्या सत्तासंघर्षाला सुरुवात झाली.
2019 चा फसलेला प्रयोग
त्याच परिस्थितीत 23 नोव्हेंबर 2019 रोजी भल्या पहाटे देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या साथीने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, हा सत्तास्थापनेचा प्रयोग अवघ्या 80 तासांतच फसला. फडणवीस आणि पवार यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं.
विरोधी पक्षनेते म्हणून फडणवीस
105 आमदारांच्या संख्याबळ असतानाही देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षनेते म्हणून विरोधी बाकांवर बसावं लागलं. त्यानंतर 30 जून 2022 मध्ये राज्यात पुन्हा सत्तांतर घडून मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला.
महायुतीला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवेश
महायुतीच्या सरकारला एक वर्ष पूर्ण होताच, 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीत प्रवेश केला आणि अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील सत्तासंघर्ष एक नवीन वळण घेत होतं.
2024 ला फडणवीस यांची पुन्हा मुख्यमंत्रीपदी निवड
2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून निवडण्यात आलं. राज्यात असलेल्या सत्तासंघर्षावर पडदा पडला असून, देवेंद्र फडणवीस हे आता पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. त्यांच्या या प्रवासाने महाराष्ट्रातील राजकारणाची दिशा आणि गती ठरवली आहे. 2014 च्या निवडणुकीत ते मुख्यमंत्री झाले होते आणि आता 2024 मध्ये पुन्हा ते राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळणार आहेत.