मुंबई : मुंबईतील आझाद मैदानात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शपथविधी येत्या 5 डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता होणार आहे. नवे सरकार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होणार असून भाजप पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात 25-27 मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळात भाजपला 20, शिवसेनेला 13 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवार गटाला 9 मंत्रीपदे मिळणार असल्याची विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.
पहिल्या टप्प्यात प्रत्येक पक्षाच्या आठ-नऊ मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून काही जागा रिक्त ठेवून त्यानंतर भरल्या जाणार आहेत. नव्या मंत्रिमंडळात वयाने ज्येष्ठ असलेल्या नेत्यांऐवजी तरूणांना आणि महिलांना संधी देण्याचा भाजपाचा कल आहे. दरम्यान शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपा अध्यक्ष नड्डा यांच्यासह भाजपाचे अन्य राज्यातील मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय झाला. त्यात भाजपाला 132, शिवसेनेला 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 41 जागा मिळाल्या. 5 डिसेंबरला आझाद मैदानात नवीन सरकारचा शपथविधी होणार आहे. या मंत्रिमंडळात भाजपला 20, शिवसेनेला 13 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवार गटाला 9 मंत्रीपदे मिळणार असल्याची विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. सहा आमदारांमागे एक मंत्रिपद असा फॉर्म्युला वापरत मंत्रिपद दिले जाणार असल्याची शक्यता आहे.