विजय चिडे, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. सोयगाव तालुक्यातील एका छोट्याशा गावात अवघ्या 4 महिन्यांत तब्बल 3 हजार 448 बोगस जन्मनोंदी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ग्रामपंचायतीच्या पोर्टलचा पासवर्ड चक्क बिहारमधून हॅक करून हा संपूर्ण कारभार करण्यात आला. गावची लोकसंख्या साडेचार हजार आणि जन्मनोंदी साडेतीन हजार झाल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. आरोग्य संचालकांनी या सर्व नोंदी रद्द करण्याचे आदेश दिले असून सोयगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोगस जन्म नोंदणी दाखले काढण्यासाठी किंवा देशविघातक कृत्यांसाठी बाहेरील देशातील जन्म नोंदी असल्याचा संशय असल्याचं जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं. या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा : Raj Thackeray Eknath Shinde : आताची मोठी बातमी, राज ठाकरे नंदनवन बंगल्यावर एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
विशेष म्हणजे, जन्म-मृत्यू नोंदीच्या पोर्टलचा पासवर्ड थेट बिहारमधून 'हॅक' करून हा उपद्व्याप केल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. राज्याच्या आरोग्यविषयक माहिती आणि जन्म-मृत्यू विभागाच्या संचालकांच्या आदेशानुसार या नोंदी रद्द करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गेल्या वर्षभरात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बांगलादेशी नागरिकांनी संभाजीनगर जिल्ह्यात जन्म-मृत्यूंच्या बोगस नोंदी केल्या आहेत. त्याची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. आता या प्रकारामुळे किरीट सोमय्या यांच्या मागणीला पुष्टी मिळाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात मोहळाई ग्रुप ग्रामपंचायत या आहे. ग्रामपंचायतीअंतर्गत मोहळाई आणि पिंप्री अंतुर ही दोन गावे येतात. या ग्रामपंचायतीचे मुख्यालय मोहळाई येथे आहे. त्या ग्रामपंचायतीच्या सीआरएस पोर्टलच्या युजर आयडीद्वारे मौजे पिंप्री अंतुर या गावात 1 एप्रिल 2025 ते 2 ऑगस्ट 2025 पर्यंत जन्माच्या 3 हजार 448 आणि मृत्यूच्या आठ नोंदी झाल्या आहेत का?, याची चौकशी ग्रामसेवक तुळशीदास गोसावी यांनी संगणक परिचालकाकडे केली. तेव्हा त्यांनी संबंधित यूजर आयडी वापरात नसल्याचे सांगितले. मग इतक्या नोंदी कशा काय झाल्या?, हा प्रश्न पडल्याने चौकशी केल्यानंतर हे सत्य उघडकीस आले. त्यानंतर जिल्हा आरोग्याधिकारी कार्यालयातील सांख्यिकी अधिकाऱ्याकडून या घटनेतील तथ्य शोधले असता, त्या युजर आयडीचा पासवर्ड बिहार येथील व्यक्तीने 'हॅक' करून हे कृत्य केल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर ही बाब तत्काळ राज्याच्या आरोग्यविषयक माहिती आणि जन्म-मृत्यू विभागाच्या संचालकांना कळविली. त्यानंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करून या नोंदी रद्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार सोयगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामध्ये आता जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सायबरच्या दृष्टिकोनातून तपास होणार असून यामध्ये देश विघातक कृत्य करण्यासाठी देशाबाहेरील लोकांचे जन्म प्रमाणपत्र काढल्या जाण्याचा संशय असल्याचे सांगितला आहे. त्यामुळे पोलिसांची या प्रकरणात अजूनच कसून चौकशी सुरू आहे.
दरम्यान, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी सांगितले की, आमच्या ग्रामपंचायतीचा पोर्टल आयडी एका तरुणाने हॅक केला. त्यातून त्याने 3 हजार 447 जन्म नोंदी केल्या आहेत. त्यासंदर्भात आम्ही गुन्हा दाखल केला. 2011 च्या जनगणनेनुसार, गावाची लोकसंख्या 900 होती. ती आता 2 हजारच्या आसपास गेली असावी. मात्र कुठलेही बिहारी किंवा इतर राज्यातील लोकं आमच्या येथे राहत नाही, अशी प्रतिक्रिया मोहळाई ग्रामपंचायतचे सरपंच संदीप राठोड यांनी दिली.