Friday, March 13, 2026 10:32:56 PM

संतापजनक! 4 वर्षीय चिमुरडा रात्रभर शाळेतच कोंडला गेला; अपहरणाची चर्चा अन् आई-वडिलांच्या काळजाला घोर..

4 वर्षीय चिमुकला खेळता-खेळता शाळेतच झोपला. वर्गखोल्या बंद करताना कर्मचाऱ्यांनी आत नीट पाहिले नाही. यामुळे चिमुरड्यावर बाका प्रसंग ओढवला. या प्रकरणी अंगणवाडी प्रशासनावर संताप व्यक्त होत आहे.

संतापजनक 4 वर्षीय चिमुरडा रात्रभर शाळेतच कोंडला गेला अपहरणाची चर्चा अन् आई-वडिलांच्या काळजाला घोर

Anganwadi Negligence in Khaperkheda : एका अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या बेजबाबदारपणामुळे एक 4 वर्षीय चिमुरडा रात्रभर अंगणवाडीच्या खोलीतच कोंडला गेला. मुलगा बेपत्ता झाल्याने परिसरात अपहरणाची चर्चा पसरली होती. पोलिसातही तक्रार दाखल करण्यात आली. मात्र रात्रभर शोध घेतल्यानंतर हा चिमुरडा सुखरूप आढळला. यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. मात्र, या घटनेमुळे अंगणवाडीच्या सेविका आणि जिल्हा प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लहान मुले शाळेत असताना वर्गखोल्या न तपासता कुलूप लावणे हा गंभीर निष्काळजीपणा असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. 

खेळता खेळता चिमुकला झोपला अन्..
खापरखेडा येथील बोरकर लेआऊटमध्ये असलेल्या अंगणवाडीत हिमांशू नावाचा 4 वर्षीय मुलगा शिकायला जातो. 20 फेब्रुवारी 2026 रोजी शाळेच्या वेळेत हिमांशू खेळता खेळता एका कोपऱ्यात झोपी गेला. अंगणवाडी सुटण्याची वेळ झाली असता, तिथल्या कर्मचाऱ्यांनी वर्गखोलीत कोणी आहे की नाही याची कोणतीही तपासणी न करता थेट बाहेरून कुलूप लावले. हिमांशू गाढ झोपेत असल्याने त्याला काहीच समजले नाही आणि तो रात्रभर त्या अंधाऱ्या खोलीतच अडकून राहिला. नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा परिसरातून ही अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे.

हेही वाचा - Holi Special Train Service : होळीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी गुड न्यूज! मध्य रेल्वेच्या 34 विशेष गाड्यांना मुदतवाढ; आरक्षण सुरू

अपहरणाची चर्चा आणि पोलिसांची धावपळ
मुलगा वेळेवर घरी न परतल्याने पालकांची घाबरगुंडी उडाली. परिसरात शोधाशोध करूनही हिमांशूचा पत्ता लागला नाही, त्यामुळे अपहरणाची भीती व्यक्त केली जात होती. पालकांनी तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून खापरखेडा पोलिसांनी तपासासाठी 7 पथके तैनात केली. पोलिसांनी रात्रभर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, तलाव आणि नाल्यांच्या परिसरात शोध मोहीम राबवली, मात्र हिमांशूचा सुगावा लागला नाही.

असा लागला छडा
सकाळच्या सुमारास पोलीस उपायुक्त संदीप पखाले यांनी स्वतः अंगणवाडीची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. अंगणवाडीचे कुलूप उघडताच हिमांशू तिथे सुरक्षित अवस्थेत आढळला. आपल्या लाडक्या लेकाला सुखरूप पाहताच आईने हंबरडा फोडला, तर वडिलांच्या जिवात जीव आला. हिमांशूची प्रकृती सध्या स्थिर आहे, मात्र या प्रसंगामुळे तो कमालीचा घाबरलेला होता. याप्रकरणी संबंधित अंगणवाडी सेविकेची चौकशी सुरू असून, तिच्यावर कठोर कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. पोलीस उपायुक्तांनी इतर सर्व अंगणवाड्यांनाही सूचना दिल्या आहेत की, शाळा सुटताना प्रत्येक विद्यार्थ्याची खात्री करूनच त्यांना घरी पाठवावे.

हेही वाचा - Tadoba Tiger Reserve : ताडोबात उन्हाळ्याची चाहूल! सफारीच्या वेळेत बदल; पर्यटकांना नव्या वेळा नोंदवून घेण्याचे आवाहन 


सम्बन्धित सामग्री