Wednesday, February 18, 2026 09:14:41 AM

IND vs PAK T20 World Cup : 'कोणत्याही परिस्थितीत भारताविरुद्ध खेळणार नाही...'; पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा खळबळजनक दावा

पाकिस्तान सरकारने 15 फेब्रुवारी 2026 रोजी कोलंबो येथे होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमधील भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

ind vs pak t20 world cup  कोणत्याही परिस्थितीत भारताविरुद्ध खेळणार नाही पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा खळबळजनक दावा

IND vs PAK T20 World Cup: क्रिकेट विश्वात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पारंपरिक द्वंद्व आता मैदानाऐवजी राजकीय पटलावर गाजण्याची शक्यता आहे. पाकिस्तान सरकारने 15 फेब्रुवारी 2026 रोजी कोलंबो येथे होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमधील भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू बासित अली यांनी "पाकिस्तान आता अंतिम फेरीत पोहोचला आणि समोर भारत असला तरी खेळणार नाही," असा खळबळजनक दावा केला आहे.

बासित अलींचा 'यू-टर्न' न घेण्याचा इशारा
बासित अली यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना स्पष्ट केले की, दक्षिण आशियाई देशांमध्ये सरकारचा निर्णय हा अंतिम असतो. बासित अलींच्या मते, जय शाह यांनी बीसीसीआय अध्यक्ष असताना चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात येण्याचे आश्वासन दिले होते, जे त्यांनी आयसीसीमध्ये गेल्यावर पाळले नाही. आयसीसी केवळ बीसीसीआयच्या महसुलाकडे बघून निर्णय घेते आणि पाकिस्तान किंवा बांगलादेशसारख्या देशांच्या मागणीकडे दुर्लक्ष करते, असा आरोप त्यांनी केला आहे. आशिया चषकावेळी भारतीय संघाने मोहसीन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी का स्वीकारली नाही? असा सवाल करत बासित अलींनी भारतीय सरकारच्या हस्तक्षेपावर बोट ठेवले.

हेही वाचा - Sports Budget 2026: खेळाडूंना जागतिक व्यासपीठावर नेण्यासाठी केंद्र सरकारचा मास्टरप्लॅन! बजेट 2026 मध्ये क्रीडा क्षेत्रासाठी दोन महत्त्वाचे निर्णय

आयसीसीच्या दंडात्मक कारवाईची टांगती तलवार
पाकिस्तानने जर वर्ल्ड कपमधील या महत्त्वाच्या सामन्यातून माघार घेतली, तर आयसीसी त्यांच्यावर कडक कारवाई करू शकते. सामन्याचे प्रक्षेपण आणि तिकिटांच्या महसुलाचे नुकसान भरून काढण्यासाठी पाकिस्ताकडून मोठा दंड आकारला जावू शकतो. तसेच भविष्यातील आयसीसी स्पर्धांमध्ये पाकिस्तानच्या सहभागावर बंदी घालण्यात येऊ शकते.  

क्रिकेटमधील 'कोल्ड वॉर' अधिक तीव्र
पाकिस्तान सरकारने केवळ पुरुष संघाच्या सामन्यावरच नाही, तर महिला क्रिकेट आणि आशिया चषक स्पर्धांमधील सहभागावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. "आता आयसीसीचे डोळे उघडतील," अशा शब्दात बासित अलींनी पाकिस्तान सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा संघर्ष आता केवळ खेळापुरता मर्यादित न राहता पूर्णपणे 'क्रिकेट डिप्लोमसी'च्या वळणावर येऊन थांबला आहे.
 


सम्बन्धित सामग्री