Wednesday, February 18, 2026 08:52:37 AM

India vs Pakistan : अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचे पाकिस्तानला 253 धावांचे लक्ष्य; कोण मारणार बाजी?

बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 49.5 षटकांत सर्वबाद 252 धावा केल्या.

india vs pakistan   अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचे पाकिस्तानला 253 धावांचे लक्ष्य कोण मारणार बाजी

Under-19 World Cup 2026: अंडर-19 विश्वचषकातील अत्यंत महत्त्वाच्या आणि उपांत्य फेरीचे (Semi-final) भवितव्य ठरवणाऱ्या सामन्यात आज भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने आले आहेत. बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 49.5 षटकांत सर्वबाद 252 धावा केल्या. पाकिस्तानला आता उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी 253 धावांचे आव्हान पार करावे लागणार आहे.

वेदांत आणि कनिष्कची झुंजार फलंदाजी
भारतीय डावाची सुरुवात खराब झाली होती, अवघ्या 47 धावांत भारताचे 3 मुख्य फलंदाज बाद झाले. सलामीवीर वैभव सूर्यवंशी स्वस्त्यात परतल्यानंतर संघ अडचणीत सापडला होता. मात्र, विहान मल्होत्रा आणि वेदांत त्रिवेदी यांनी अर्धशतकी भागीदारी करून डाव सावरला. वेदांत त्रिवेदीने 68 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यानंतर खालच्या फळीत कनिष्क चौहान आणि खिलन पटेल यांनी केलेल्या शानदार फलंदाजीमुळे टीम इंडियाला 250 धावांचा टप्पा ओलांडता आला. पाकिस्तानच्या वतीने मोमिन कमरने मोक्याच्या क्षणी बळी घेतले.

उपांत्य फेरीची शर्यत; चौथा संघ कोण?
हा सामना सुपर सिक्स फेरीतील शेवटचा सामना असून तो तांत्रिकदृष्ट्या 'चौथी उपांत्य फेरी' मानली जात आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि अफगाणिस्तान या तीन संघांनी यापूर्वीच उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. आजच्या सामन्यात जो संघ जिंकेल, तो उपांत्य फेरीचा चौथा संघ ठरेल. पाचवेळा जगज्जेता राहिलेला भारतीय संघ आशिया चषकातील पराभवाचा बदला घेण्यासाठी मैदानात उतरला आहे.

हेही वाचा - WPL 2026: मुंबईचे 'जायंट' टेन्शन! सलग आठ पराभवानंतर गुजरातचा ऐतिहासिक विजय; हरमनप्रीतची खेळी ठरली व्यर्थ

कर्णधारांनी टाळले हस्तांदोलन
सामन्याच्या सुरुवातीलाच मैदानावर तणाव पाहायला मिळाला. नाणेफेकीच्या (Toss) वेळी भारतीय कर्णधार आयुष म्हात्रेने पाकिस्तानचा कर्णधार फरहान युसूफ याच्याशी हस्तांदोलन (Handshake) करणे टाळले. दोन्ही देशांमधील क्रिकेट संबंधांच्या पार्श्वभूमीवर हे आधीच अपेक्षित मानले जात होते, मात्र यामुळे सामन्यातील चुरस अधिकच वाढली आहे.

दोन्ही संघांचे 'प्लेइंग इलेव्हन 
भारत: आरोन जॉर्ज, वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा, अभिज्ञान कुंडू, वेदांत त्रिवेदी, आरएस अम्ब्रिस, कनिष्क चौहान, खिलन पटेल, हेनिल पटेल, दीपेश देवेंद्रन.

पाकिस्तान: हमजा जहूर, समीर मिन्हास, उस्मान खान, अहमद हुसैन, फरहान युसूफ (कर्णधार), हुजैफा अहसान, अली हसन बलोच, अब्दुल सुभान, मोमीन कमर, मोहम्मद सय्यम, अली रझा.


सम्बन्धित सामग्री